भावनिक आवाहनातून कार्यकर्त्यांना साद
By Admin | Updated: July 19, 2014 23:51 IST2014-07-19T23:34:13+5:302014-07-19T23:51:25+5:30
नारायण राणेंचा सिंधुदुर्गात दौरा : प्रत्येक तालुक्यात कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी

भावनिक आवाहनातून कार्यकर्त्यांना साद
कणकवली, वैभववाडी, मालवण : माझ्या राजीनाम्याने कोणी नाराज होऊ नका आणि डगमगूही नका. मी जो निर्णय घेईन तो सर्वांच्या हिताचा असेल. तुम्ही एकजुटीने पाठिशी राहाल तर कोणतीही लढाई मी जिंकेन, अशी भावनिक साद पालकमंत्री नारायण राणे यांनी कणकवलीतील कार्यकर्ता मेळाव्यात घातली.
यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, कोकण पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, उपाध्यक्ष संदेश सावंत, सभापती मैथिली तेली, उपसभापती बबन हळदिवे, नगराध्यक्षा अॅड. प्रज्ञा खोत, सुदन बांदिवडेकर, अस्मिता बांदेकर, नंदू सावंत, प्रणिता पाताडे, डॉ. मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
माझ्या पुढील निर्णयासाठी जिल्ह्यातील जनतेचे आशीर्वाद मिळावेत यासाठी हा दौरा आहे. माझा कोणताही निर्णय तुम्हा सर्वांना विश्वासात घेऊनच होईल. औकात नसणारी काही माणसे मी कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी याचे सल्ले देत आहेत. मी जिल्ह्यापुरता मर्यादित नाही. सलग सात विधानसभा जिंकल्या आहेत. जठारांसारखे आता कुठे आमदार झाले आहेत. त्यांना जिथे-तिथे टीका करण्यासाठी नारायण राणेच दिसतात. आमदार केसरकर यांनी गेल्या पाच वर्षांत एकतरी प्रकल्प, योजना आणली आहे का? हे सांगावे. जिल्ह्यातील प्रत्येक रस्ता, शाळा, पॉलिटक्निक, अभियांत्रिकी महाविद्यालय, आयटीआय कोणामुळे झाली आहेत, हे यांनी सांगावे. मी केलेले कार्य तुमच्यासमोर आहे.
माणगांव येथे हत्तींच्या हल्ल्यात ठार झालेल्यांसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. मात्र, हे आंदोलन निवडणुकीच्या तोंडावरचा दिखावा आहे. यापूर्वी आठ लोक हत्तींच्या हल्ल्यात बळी पडले तेव्हा शिवसेनेवाले कुठे होते? मी आतापर्यंत प्रत्येकाला सांभाळले आहे, असे राणे म्हणाले.
आम्ही कमवायला सिंधुदुर्गात येत नाही. आजपर्यंत कुठल्या ठेकेदाराकडून पैसे घेतले नाहीत. जिल्ह्यासाठी काम केले परंतु एका मोदी लाटेने ते सर्व धुवून गेले. एकदाच पराभव झाला परंतु तो जिव्हारी लागला. आता झालेली चूक पुन्हा होऊ देऊ नका. आपल्या माणसाला निवडून आणायचे नाही तर कोणाला आणायचे? असा प्रश्न राणे यांनी केला. समोर गोड बोलण्याने मी खूष होणार नाही. एकजूट दाखवा, असे राणे म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री
पदाची स्वप्ने पाहू नयेत
जामसंडे : माझा सावलीला घाबरणारे कोणाला भयमुक्त करणार? असा प्रश्न पालकमंत्री नारायण राणे यांनी जामसंडमध्ये शनिवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा भेट कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना विचारला. विधानसभेला शिवसेनेचे २५ ते ३० आमदार निवडून आले तरी खूप झाले. उद्धव ठाकरेंनी उगाचच मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहू नयेत, अशी टीकाही त्यांनी बोलताना केली.
यावेळी मंचावर राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, डॉ. मिलिंद कुलकर्णी, देवगड तालुकाध्यक्ष प्रकाश राणे, कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा सरचिटणीस बाळा खडपे, जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, वैभव बिडये, प्रकाश गायकवाड, दत्ता सामंत, चंदू राणे, सभापती सदानंद देसाई यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला देवगड तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा प्रियांका साळसकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जनार्दन तेली, माजी जिल्हा परिषद सभापती निकिता तानवडे, आरिफ बगदादी, मिलिंद माने, उल्हास मणचेकर, उपसभापती अनघा राणे, माजी उपसभापती रविंद्र जोगल यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह अनेक आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवित नारायण राणे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे नारायण राणे यांनी भविष्यात घेतलेल्या निर्णयाला देवगड तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा पूर्णपणे पाठिंबा असणार हे स्पष्ट झाले.
येथील लोकांना देव मानतो
कुडाळ : येथील गुलमोहर सभागृहात नारायण राणेंचा आज कार्यकर्त्यांच्या भेटी दरम्यान भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या जिल्ह्याला मी मंदिर मानतो. येथील लोकांना देव मानतो. येथील जनतेमुळेच असून पुढील वाटचालीसाठी मला शुभेच्छा, प्रेम, सहकाऱ्यांचे आशीर्वाद द्यावेत या करीता सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी आलो आहे. असेही राणे म्हणाले. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते काका कुडाळकर, राजन तेली यांची अनुपस्थिती होती.
काँग्रेसने अवहेलना केली
सहा महिन्यात मुख्यमंत्री करतो, असे सांगून नऊ वर्षे झाली तरी काँग्रेसने शब्द पाळला नसून काँग्रेस पक्षाने राणेंची अवहेलना केली, अशी टीका कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी यावेळी बोलताना केली.
मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी राणेंनी संवाद साधला. यावेळी सभापती उदय परब, नगराध्यक्ष अशोक तोडणकर, बाळू कोळंबकर, अशोक सावंत, कृष्णनाथ तांडेल, श्रावणी नाईक, कांचन
गावडे, सरोज परब आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गांधीगिरी की भूकंप लवकरच होणार स्पष्ट
केलेल्या कामाची दखल पक्षात घेतली जात नसल्याने उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंत्रीपदाच्या राजीनाम्याचे अस्त्र उपसून तूर्तास गांधीगिरी सुरू केली आहे. मात्र, त्यांचे हे बंड खरंच गांधीगिरी ठरणार की राजकीय भूकंप घडविणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. कोकणच्या दौऱ्यावर आलेल्या राणेंनी ‘पोटातले ओठावर’ आणण्यासाठी सोमवारचाच मुहूर्त पक्का केल्यामुळे ते कोणता धक्का देतात. याबाबत स्थानिक कार्यकर्ते पुरते अनभिज्ञ असल्याने ते काहीसे संभ्रमात दिसत होते. त्याशिवाय नीलेश राणेंचा पराभव तर झालाच परंतु सगळी सत्तास्थाने हाती असूनही तालुक्यातून त्यांना मोठे मताधिक्य देवू न शकल्याचे दडपणही राणेंच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
सदैव पाठिशी म्हणणाऱ्यांना फटकारले
भूमिका गुलदस्त्यात ठेवून राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असलेले उद्योगमंत्री नारायण राणे यांनी बंडाचा झेंडा हाती धरून मुलाच्या पराभवानंतरचा पहिलाच दौरा दडपणाखाली असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती जाणवत होती. विकासापेक्षा लोकांना राजकारणच हवे असेल तर घरी बसेन असे भावोद्गार राणेंनी वैभववाडी येथे काढले. त्याचप्रमाणे मुलाचा पराभव जिव्हारी लागल्याचे सांगत सदैव पाठिशी आहोत, असे सांगणाऱ्यांना राणेंनी जाता-जाता चांगलेच फटकारले.
गुलदस्त्यातील भूमिकेबाबत संभ्रम
यापूर्वी मंत्री राणे यांच्या दौऱ्यावेळी काहीना काही निमित्त काढून सतत त्यांच्या नजरेसमोर राहू पाहणारे काही कार्यकर्ते यावेळी मात्र राणेंच्या नजरेआड राहण्याचा प्रयत्न करीत होते. तर एरव्ही राणेंच्या सभेत समोरच्या पहिल्या रांगेत स्थान मिळविण्यासाठी धडपडणारे आज मात्र, घोळक्यात बसून मधूनच कुठेतरी डोकावत होते. याचे कारणही स्पष्ट होते. ते म्हणजे नीलेश राणे यांना अपेक्षेप्रमाणे देवू न शकलेल्या मताधिक्यांचे दडपण आणि मंत्री राणे यांच्या गुलदस्त्यातील भूमिकेविषयीचा संभ्रम हेच होते.
देवबागवासीय, मच्छिमार मला विसरले
सिंधुदुर्गात येवून ज्यावेळी पहिल्यांदा निवडणूक लढविली. तेव्हा देवबाग सागरी अतिक्रमणाच्या छायेत होते. समुद्र आणि नदीच्यामध्ये वसलेल्या देवबाग गावाला स्थलांतराच्या नोटीसा देण्यात आल्या होत्या. संपूर्ण गाव स्थलांतरीत होणार होते. पण मी देवबागचे स्थलांतर थांबविले. त्याकाळी देवबाग गावात जायला रस्ता नव्हता. माझ्या प्रयत्नांमुळे आज देवबाग गाव रस्त्याने जोडले गेले आहे. परंतु देवबागवासीयांसाठी केलेल्या कामाचे मतांमध्ये रूपांतर झाले नाही. लोकसभेच्या निवडणुकीत देवबागवासीय काँग्रेसला विसरले. मच्छिमारांनीही माझ्या कामाची जाण ठेवली नाही. फयानच्यावेळी इतिहासात कधीही मिळाली नाही एवढी नुकसान भरपाई मिळवून दिली. मच्छिमारांना कर्जपुरवठ्यासाठी घरतारण ठेवण्याऐवजी ट्रॉलर्सतारण ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, एकही मच्छिमार माझे आभार मानण्यासाठी आला नाही, अशी खंत नारायण राणे यांनी व्यक्त करतानाच लोकांना त्यांचे शोषण करणारे लोकप्रतिनधी जवळचे वाटू लागले आहेत. त्यामुळे आता थांबायचा विचार केला असल्याचेही राणे यांनी मालवण कुंभारमाठ येथील सभेत बोलताना व्यक्त केले.
राज्यभरातून स्वाभिमानचे कार्यकर्ते दाखल
नारायण राणे यांच्या कोकण दौऱ्यात राज्यभरातील राणेप्रेमी आणि स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करणारे ट्वीट युवा नेते आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांनी केले होते. त्यांच्या या ट्वीटरवरील आवाहनाने २५ हजार स्वाभिमान कार्यकर्ते कोकणात दाखल झाले आहेत. सर्वत्र स्वाभिमानचा झेंडा फडकवलेल्या वाहनाचे ताफे पहावयास मिळत आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील मराठवाडा, पुणे, सोलापूर, पंढरपूर, नाशिक, औरंगाबाद, विदर्भ आणि मुंबई, नवी मुंबई, ठाणे या ठिकाणांहून स्वाभिमान संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वत:ची वाहने घेऊन दाखल झाले आहेत. काहींनी तर खासगी वाहन घेऊन आपल्या भावना आणि पाठिंबा व्यक्त करण्यासाठी कणकवली गाठली आहे. ओम गणेश निवासस्थानी शनिवारी सकाळपासूनच हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची एकच गर्दी झाली होती.