नगरसेवकांच्या माहिती मागण्याला कर्मचारी कंटाळल
By Admin | Updated: November 28, 2014 00:09 IST2014-11-27T22:53:38+5:302014-11-28T00:09:22+5:30
राजकारण तापले : चिपळूण नगर परिषद कर्मचाऱ्यांचा सभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारो

नगरसेवकांच्या माहिती मागण्याला कर्मचारी कंटाळल
चिपळूण : काही नगरसेवक माहितीच्या अधिकाराचा वापर करुन विविध विभागांकडून १० ते १५ वर्षाची माहिती वारंवार मागत असल्याने कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जात आहे. त्यामुळे कार्यालयीन नियमित कामे करण्यास विलंब होत आहे. यासंदर्भात नगर परिषद प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी अन्यथा मुख्य सभेला विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत, असा इशारा चिपळूण नगर परिषद कामगार संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी प्रकाश पाटील, नगराध्यक्ष सावित्री होमकळस यांना देण्यात आले. यावेळी नगर परिषद कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत हळदे, उपाध्यक्ष रफीक सुर्वे, उपाध्यक्ष दिलीप खापरे, सेक्रेटरी सचिन शिंदे, खजिनदार राजेंद्र खातू, महेश जाधव, सल्लागार विलास चव्हाण आदींसह कर्मचारी संघटनेचे अन्य सदस्य उपस्थित होते.
काही सदस्यांकडून वारंवार माहिती अधिकाराचा वापर करुन माहिती मागविली जाते. त्यासाठी नियमित कामे सोडून कर्मचाऱ्यांना वेळ द्यावा लागतो. सदस्य हे नगर परिषदेचे विश्वस्त आहेत. त्यामुळे नगर परिषदेतर्फे होणारी विविध विषयांची माहिती व अभिलेखबाबत संपूर्ण माहिती त्यांना अवगत आहे. शिवाय आवश्यक ती माहिती समक्ष विचारणा केल्यास त्यांना पाहण्याचा अधिकार आहे. परंतु, तसे न करता काही नगरसेवक माहिती अधिकाराखाली वारंवार माहिती मागवून कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुख्य सभेमध्ये सदस्यांकडून विषयांकित कामाबाबत संबंधित कर्मचारी अथवा विभागप्रमुख यांना टार्गेट करुन विविध प्रश्नांचा भडिमार करुन मूळ विषयाव्यतिरिक्त अन्य विषयांची माहिती विचारली जात आहे. होत असल्याने कोणत्याही मुख्य सभेला संबंधित विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत, असा इशारा नगर परिषद कर्मचारी संघटनेतर्फे देण्यात आला आहे. प्रशासनाने या गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा. होणाऱ्या त्रासाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)