शहरातून चिमुकल्याची भ्रमंती -- तीन चाकी सायकलसह

By Admin | Updated: September 16, 2014 23:25 IST2014-09-16T22:22:36+5:302014-09-16T23:25:05+5:30

दोन वर्षाचा बालक : कणकवलीवासीयात रंगला चर्चेचा विषय

Embarkation of a pinch from the city - with a three wheeler bicycle | शहरातून चिमुकल्याची भ्रमंती -- तीन चाकी सायकलसह

शहरातून चिमुकल्याची भ्रमंती -- तीन चाकी सायकलसह

कणकवली : येथील शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या दोन वर्षाच्या चिमुकल्याने तीन चाकी सायकलवरून महामार्गानजीकचा शिवाजी चौक गाठला. पालकांनीही मुलाची शोधाशोध सुरु केली. काही जागरुक नागरिकांमुळे या मुलाचा ठावठिकाणा पालकांना कळला. मात्र या चिमुकल्याच्या कणकवली भ्रमंतीची चर्चा शहरात रंगली होती.
याबाबत माहिती अशी की, तीन चाकी सायकलसह एक दोन वर्षाचा मुलगा येथील शिवाजी चौकात उभा असल्याचे काही रिक्षाचालक तसेच नागरिकांना मंगळवारी दिसून आला. हा चिमुकला मुंबई-गोवा महामार्गावरून आपली तीन चाकी सायकल घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्याबरोबर कोणीच नसल्याने याठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्या चिमुकल्याला त्याची माहिती विचारली. मात्र तो बोलत नसल्याने काहीच समजू शकले नाही. काहीवेळ चौकशी करूनही त्या चिमुकल्याच्या पालकांचा पत्ता न समजल्याने नागरिकांनी पोलीस स्थानकात याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत त्या मुलाला ताब्यात घेतले व पोलीस स्थानकात आणले. काहीवेळाने आपला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार घेऊन पालक पोलीस स्थानकात आले. त्यानंतर संपूर्ण घटनेचा उलगडा झाला.शिवाजीनगर येथील शंकर रजपूत यांचा दोन वर्षांचा रामअवतार हा मुलगा असून तो आपली तीन चाकी सायकल घेऊन घराबाहेर पडला. एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापत हा मुलगा तीन चाकी सायकलसह शिवाजी चौकात पोहोचला. आपण कोठे पोहोचलो हे समजत नसल्याने तो मुंबई-गोवा महामार्गावर जाण्याचा प्रयत्न करीत होता.रिक्षाचालक तसेच नागरिकांची नजर त्याच्यावर गेली नसती तर वाहतुकीने गजबजलेल्या महामार्गावर दुर्घटनाही घडू शकली असती. मात्र जागरुक नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे या मुलाचा शोध पालकांना लागला. पोलिसांनी पालकांच्या ताब्यात त्या चिमुकल्याला दिले. मात्र तीन चाकी सायकलवरून चिमुकल्याच्या कणकवली भ्रमंतीची चर्चा शहरात रंगली होती. तर त्या चिमुकल्याच्या साहसाचे कौतुकही करण्यात येत होते. (वार्ताहर)

Web Title: Embarkation of a pinch from the city - with a three wheeler bicycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.