किनळोस येथे हत्तींची वस्तीवर चाल
By Admin | Updated: November 12, 2014 22:51 IST2014-11-12T21:34:22+5:302014-11-12T22:51:33+5:30
शेती-बागायतीचेही हत्तींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

किनळोस येथे हत्तींची वस्तीवर चाल
कडावल : किनळोस बागवेवाडी येथे मंगळवारी रात्री दोन हत्ती भरवस्तीत घुसल्यामुळे खळबळ माजली. येथील शेती- बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सातत्याने नुकसान करणाऱ्या हत्तींचा वन विभागाने कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. किनळोस-बागवेवाडी येथे काल रात्री दोन रानटी हत्ती भरवस्तीत दाखल झाल्यामुळे ग्रामस्थांची तारांबळ उडाली. येथील शेती-बागायतीचेही हत्तींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले. वन कर्मचारी व ग्रामस्थांनी मिळून हत्तींना वस्तीपासून दूर हाकलण्यात यश मिळविले असले, तरी तोपर्यंत शेती-बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
काल रात्री रामचंद्र बागवे यांच्या अंगणात हत्ती प्रथम दाखल झाले. त्यांनी आपल्या घराच्या पुढील पडवीत नाचणीची कणसे वाळत टाकली होती. हत्तींनी यातील काही कणसे फस्त केली. हत्तींची चाहूल लागताच घरातील माणसांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा घराच्या मागील भागाकडे वळविला. तेथे असलेल्या माड बागायतीमधील सुमारे २० माड जमीनदोस्त केले. येथील शेतकरी पंढरीनाथ बागवे यांच्या केळींचे व भातशेतीचेही या हत्तींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
हत्ती येथील शेती-बागायतीचे नुकसान करत असताना ग्रामस्थांनी याची माहिती वनविभागाला दूरध्वनीवरून दिली होती. काही वेळातच वनकर्मचारी देसाई व त्यांचे प्रथम मानवी वस्तीपासून दूर नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार वनकर्मचारी व ग्रामस्थांनी संयुक्तपणे हत्ती हटाव मोहीम राबविंली. फटाके व डबे वाजवून हत्तींना वस्तीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. हत्तींना वाडीतून बाहेर काढण्यासाठी निकराचे प्रयत्न करण्यात आले. बऱ्याच वेळानंतर दोन्ही हत्ती वस्तीमधून बाहेर पडून बोभाटा भागाच्या दिशेने मार्गस्थ झाले. हत्ती हटाव मोहिमेत वनकर्मचाऱ्यांबरोबर शिवराम राणे, अनंत बागवे, सुरेश बागवे, दिवाकर बागवे, एकनाथ साटम, नरेश बागवे, श्रीकृष्ण बागवे, आदेश बागवे, सत्यम बागवे आदींनी सहभाग घेतला. दरम्यान, वन्य प्राण्यांकडून शेतीबागायतीचे सातत्याने नुकसान होत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. रानटी हत्तींपासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून वनविभागाने हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)