वेत्येत हत्तींकडून नुकसान
By Admin | Updated: August 11, 2014 22:01 IST2014-08-11T21:45:35+5:302014-08-11T22:01:26+5:30
मोर्चा सावंतवाडीकडे : माड, केळी, भातशेतीची नासधूस

वेत्येत हत्तींकडून नुकसान
सावंतवाडी : कुडाळ, दोडामार्ग तालुक्यात भातशेती व माड बागायतींचे लाखोंचे नुकसान केल्यानंतर हत्तींनी आता सावंतवाडी तालुक्याकडे रोख वळविला आहे. वेत्ये-नमसवाडी येथे रविवारी मध्यरात्री हत्तींच्या कळपाने माड, केळी बागायतींसह भातशेतीत धुडगूस घातला. यामध्ये वेत्ये येथील अण्णा तांबोसकर यांचे सुमारे एक लाख व रवींद्र गावडे यांचे पन्नास हजार रुपये असे एकूण दीड लाखाचे नुकसान झाले आहे.
मडुरा-शेर्ले येथून आलेल्या हत्तींंच्या कळपाने रविवारी १२ वाजण्याच्या सुरुवातीस वेत्ये-नमसवाडी परिसरात प्रवेश करत माड, केळी बागायतींसह भातशेती व ऊसाच्या शेतीचीही नासधूस केली. तेथील अण्णा तांबोसकर यांच्या सुमारे १५ गुंठे भातशेतीसह ऊस आणि २१ माडांचे नुकसान केले. तर रवींद्र गावडे यांच्या सुमारे २० गुंठे भातशेतीचे नुकसान करत १० माड आणि ५० केळी जमीनदोस्त केल्या. सोमवारी सायंकाळी उशिरा पंचनामा करण्यात आला. तांबोसकर यांची शेतीबागायती शहरालगतच असल्याने हत्ती शहरातही घुसण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच येथील शेतकऱ्यांच्या घरांलगतच शेती व बागायती असल्याने या हत्तींचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. रविवारी रात्री हत्तींनी घातलेल्या धुडगुसामुळे वेत्येसह मळगाव, सोनुर्ली भागातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सोनुर्ली भागात गेले कित्येक दिवस हत्तींचा वावर असून हातातोंडाशी आलेली शेती हिरावली जात आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतरही वनविभागाने याबाबत कोणतीही उपाययोजना न केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. मागील आठवड्यात हत्तींनी शेर्ले येथील मुकुंद शेर्लेकर यांच्या घरातच घुसण्याचा प्रयत्न केल्याने या ग्रामस्थांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. दरम्यान, मडुरे-शेर्ले भागातून आलेल्या दोन ते तीन हत्तींचा हा कळप न्हावेली-निरवडे गावाच्या दिशेने गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. (वार्ताहर)
शेतकरी चिंतातूर
सोनुर्ली गावानंतर आता वेत्ये परिसरातही हत्तींनी नुकसान केल्यामुळे सावंतवाडी तालुक्यात हत्तींचा वावर वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हत्तींचा बंदोबस्त टाळण्यासाठी वनविभाग आता कोणते पाऊल उचलतो, याकडे शेतकरीवर्गाचे लक्ष लागून राहिले आहे.