हत्ती पकड मोहीम युध्दपातळीवर
By Admin | Updated: December 26, 2014 23:59 IST2014-12-26T21:53:38+5:302014-12-26T23:59:27+5:30
उपवनसंरक्षकांची माहिती : दोन हत्तींना आंबेरीत प्रशिक्षण : हत्तिणीची रवानगी तिलारीत

हत्ती पकड मोहीम युध्दपातळीवर
कुडाळ : जिल्ह्यातील माणगाव परिसरातील हत्तींना पकडून प्रशिक्षित बनविण्याच्या मोहिमेच्या पूर्वतयारीची पाहणी खासदार विनायक राऊत यांनी आंबेरी येथील हत्ती हटाव कॅम्पच्या ठिकाणी जाऊन केली. यावेळी दोन हत्तींना आंबेरी येथे प्रशिक्षीत करण्यात येणार असून त्यातील हत्तिणीला पकडून तिलारी बॅक वॉटर येथील जंगलात सोडण्यात येईल, अशी माहिती सावंतवाडीचे उपवनसरंक्षक एस. रमेशकुमार यांनी खासदार राऊत यांना दिली.
हत्तींना पकडून प्रशिक्षण माहिमेसंदर्भात कुडाळ येथे बोलाविलेल्या आढावा बैठक संपल्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी रानटी हत्तींना पकडून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणाऱ्या आंबेरी येथील कॅम्पच्या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार वैभव नाईक, उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार, पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार, कुडाळचे वनक्षेत्रपाल संजय कदम तसेच वनविभाग व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
यावेळी येथे हत्तींना कशाप्रकारे ठेवण्यात येणार, त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार देण्यात येणारे खाद्य आणले आहे काय? पाणी पुरवठा कसा आहे? योग्य प्रकारे सर्व सोयीसुविधा आहेत की नाहीत, याची पाहणी खासदार राऊ त यांनी केली.
आढावा बैठकीच्या वेळी वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी येथील क्षेत्र हे हत्तीबाधित करा, असे निवेदन खासदारांना दिले. मात्र, राऊत यांनी, येथील क्षेत्र हे कदापी हत्तीबाधित करायला देणार नसून येथील जनतेची हत्तींपासून सुटका करून या हत्तींना योग्य ठिकाणी नेण्यात येईल, असे सांगितले.
‘त्या’ तिन्ही हत्तींना प्रशिक्षित करा, असा आदेश खासदार राऊत यांनी वनअधिकाऱ्यांना दिला. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करा. सर्व काही चांगले होईल. हत्ती पकड मोहिमेसाठी राज्य व केंद्र सरकारकडून हवी ती मदत मिळवून देऊ, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
तीन टप्प्यात राबविणार मोहीम
या मोहिमेत आलेल्या पथकांकडून हत्तींचा शोध घेतला जाईल. योग्य जागी त्यांना बेशुध्द करण्याची लस देण्यात येईल. बेशुध्द झालेल्या हत्तींना प्रशिक्षित हत्तींच्या साहय्याने आंबेरी येथील कॅम्पच्या ठिकाणी आणण्यात येईल. त्यानंतर तेथे फक्त दोन हत्तींना ठेवण्यात येईल. मोठ्या हत्तिणीला तिलारी हत्ती परिसरात सोडण्यात येईल. दोन हत्तींना ‘कुणकी’ हत्ती प्रशिक्षण देऊन माणसाळवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत. हत्ती माणसाळल्यानंतर त्यांना येथून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात येईल.
कमी वेळेत मोहीम राबवा
कमीत कमी वेळेत मोहीम राबवा. मे महिन्यानंतर पावसाळा सुरू होणार असल्याने त्या अगोदरच हत्तींना प्रशिक्षित करा, असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केले.