हत्तींचे धुमशान सुरुच
By Admin | Updated: January 5, 2015 00:37 IST2015-01-04T22:57:08+5:302015-01-05T00:37:01+5:30
वैभववाडी तालुक्यात नुकसान : शेतकरी भयभीत

हत्तींचे धुमशान सुरुच
वैभववाडी : आचिर्णे घाणेगड येथील मुक्काम हलवून दोन रानटी हत्ती खांबाळे, एडगांवमार्गे कुंभवडेच्या जंगलाकडे सरकले आहेत. या प्रवासात त्यांनी ३ गावातील ८ शेतकऱ्यांचे माड, केळी व ऊसशेतीचे नुकसान करीत अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आचिर्णे मधलीवाडीतील श्रीधर मारुती रावराणे यांच्या घराचा दरवाजा हत्तीने तोडला. पहिल्यांदाच आचिर्णेची हद्द ओलांडून हत्ती पुढे कुंभवडेकडे सरकल्यामुळे खांबाळे, वाभवे, एडगांव परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत.
वैभववाडी तालुक्यात दुसऱ्यांदा रानटी हत्तींनी एन्ट्री केली. शुक्रवारी रात्री आचिर्णे घाणेगडवाडीत मुक्काम केल्यानंतर शनिवारी त्यांनी खांबाळे खालच्यावाडीत रात्री ११.३० वाजता हजेरी लावली. तेथून वाभवेमार्गे एडगाव पवारवाडी, फौजदारवाडीतून माड व केळींची नासधूस करत पहाटे ५ च्या सुमारास हत्तींनी कुंभवडेच्या जंगलाचा मार्ग धरला. हत्ती आल्याची माहिती मिळताच खांबाळे व एडगावमध्ये धांदल उडाली.
१२ किलोमीटर प्रवास
आचिर्णे घाणेगडचे जंगल ते कुंभवडे या १२ किलोमीटरच्या प्रवासात दोन रानटी हत्तींनी आचिर्णेतील महेश आत्माराम रावराणे यांची ऊसशेती, खांबाळेतील परशुराम मोहिते, अनंत वळंजू, जयसिंग मोहिते यांचे माड व केळी, एडगाव येथील रवींद्र रावराणे यांचे माड व केळी तर विश्वनाथ रावराणे यांची केळीची बाग जमीनदोस्त केली.
तसेच खांबाळे मोहितेवाडीतील शिवाजी पवार यांच्या घरातील भाताच्या गोणीची नासधूस केली. एका रात्रीत ८ शेतकऱ्यांच्या ऊसशेतीसह माड, केळींचे नुकसान केल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.
कुंभवडेत घनदाट जंगल आहे. त्यामुळे याठिकाणी हत्ती स्थिरावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हत्तींनी कुंभवडेतून मुक्काम हलविला तर पुढे कुंभारी तिरवडेमार्गे भुईबावडा-ऐनारीकडे सरकण्याची शक्यता आहे किंवा सोनाळीतून कुसूर नापणे असा प्रवास त्यांनी सुरु केल्यास ऊस शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. (प्रतिनिधी)
दरवाजावरील धडकेने उडवला थरकाप
खांबाळेत दाखल होण्यापूर्वी शनिवारी रात्री ११ वाजता एका हत्तीने आचिर्णे मधलीवाडीतील श्रीधर मारुती रावराणे यांच्या घराचा पुढचा दरवाजा धडक मारुन तोडला. त्यावेळी ओट्यावर झोपलेली मुले, माणसे खडबडून जागी झाली. त्यांनी घरातील लाईट लावताच दरवाजातून आत आलेली सोंड पाहून १४ वर्षांचा त्यांचा मुलगा बेशुद्ध पडला. त्यामुळे सारेच गोंधळले. मात्र, लाईट लागताच हत्तीने पुढचा मार्ग धरल्यामुळे अनर्थ टळला.
दुसऱ्यांदा तालुक्यात दाखल झालेल्या हत्तींनी दुसऱ्या रात्री तीन गावात नुकसान करून कुंभवडेकडे मार्गक्रमण केल्यामुळे वनक्षेत्रपाल आर. एस. पाटील, वनपाल सावंत व २५ वनरक्षकांचे पथक हत्तींच्या मागावर आहेत.