हत्तींच्या कळपाचा धुडगूस

By Admin | Updated: November 20, 2014 00:02 IST2014-11-19T21:45:13+5:302014-11-20T00:02:56+5:30

कणकवली तालुक्यात वावर : पिसेकामते, बिडवाडीत शेतीचे नुकसान

Elephant flock | हत्तींच्या कळपाचा धुडगूस

हत्तींच्या कळपाचा धुडगूस

कणकवली : मंगळवारी रात्रीपासून जंगली हत्तींच्या कळपाने पिसेकामते, बिडवाडी, तरंदळे परिसरात बागायतीचे नुकसान केले. जंगली हत्तींच्या वावराने परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बुधवारी सायंकाळपासून तरंदळे धरण परिसरात आढळलेल्या या हत्तींना हुसकावून लावण्याचे प्रयत्न वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केले आहेत.
मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास पिसेकामते कदमवाडीतील माजी उपसरपंच विलास कदम यांच्या पत्नीला आवाज आल्याने त्या घराबाहेर आल्या. तेव्हा बॅटरीच्या प्रकाशात त्यांना हत्ती दिसले आणि त्यांनी ओरड मारली. थोड्याच वेळात पूर्ण वाडीत ही वार्ता पसरली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनाही कळविण्यात आले.
रात्रीपासून शोधाशोध
पिसेकामते परिसरात हत्ती आल्याचे वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर रात्री १२ वाजण्याच्या सुमारास वनविभागाचे पथक दाखल झाले. वनपाल नाना तावडे यांच्यासह वनरक्षक उत्तम कांबळे, सारिक फकीर, दत्तगुरू पिळणकर, सूरज बाबूल, एस.ए.मणेर, मधु सावंत, म.ल.गुडेकर आदींच्या पथकाने हत्तींच्या शोधार्थ मोहीम राबवली. मात्र, हत्तींचे थेट दर्शन झाले नाही. रात्री ३.३० वाजेपर्यंत ही शोधमोहिम सुरू ठेवण्यात आली होती.
हत्तींच्या पावलांच्या ठशांवरून आणि बागायतीच्या नुकसानीवरून बुधवारी सकाळी पुन्हा पिसेकामते येथील जंगलमय भागात वनविभागाकडून शोधमोहिम राबविण्यात आली. तेव्हा बिडवाडी आणि नंतर तरंदळे धरण परिसरात हत्तींचा वावर असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. तरंदळे परिसरात दोन हत्ती वनविभागाच्या पथकाला दिसले. (प्रतिनिधी)

यापूर्वी दोनवेळा आगमन
कणकवली तालुक्यात हत्तींचा प्रवेश दोन वर्षांपूर्वी एकदा आणि त्यामागील वर्षी असा दोन वेळा झाला होता. त्यावेळीही हत्तींनी परिसरातील बागायतीचे नुकसान केले होते. थंडीच्या मोसमात हत्तींचे आगमन होत असल्याचे दिसून आले आहे.


माडबागायतीचे नुकसान
कदमवाडीतील सुभाष परूळेकर यांच्या केळी, पोफळी, माडाचे हत्तींनी नुकसान केले. शैलेश डिचोलकर यांचे सात माड मोडून टाकले. उपसरपंच विलास कदम यांचे दोन माड मोडले. अनंत तळवणेकर यांचा गडगा तोडून टाकला. अपर्णा सावंत यांच्या केळीही हत्तींनी मोडून टाकल्या. तरंदळे दाभळवाडीतील पंढरीनाथ कदम यांच्या केळी व माडांचे नुकसान हत्तींनी केले आहे. वनविभागाकडून या नुकसानीचा पंचनामा करण्यात येत आहे. तसेच ग्रामस्थांनी सायंकाळनंतर घराबाहेर पडू नये, असे वनविभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.


तीन पथके
या हत्तींना पुन्हा आल्यामार्गे हुसकावण्यासाठी वनविभागाची तीन पथके करण्यात आली. एक हुंबरणे येथून, एक तरंदळे येथून आणि त्यामध्ये एक अशी तीन पथके या हत्तींना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहेत.

दोन जंगली हत्ती
पिसेकामतेत दाखल झालेल्या या हत्तींची संख्या दोन असल्याचे वनपाल नाना तावडे यांनी सांगितले. माणगांव खोऱ्यात वास्तव्यास असलेले हे हत्ती पुढे कसालमार्गे पुढे आले असावेत. गडनदी पोहून पलिकडे आले असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. पिसेकामते परिसरात रात्री पाच हत्ती असल्याची चर्चा ग्रामस्थांमधून होत होती.

Web Title: Elephant flock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.