हत्तींच्या कळपाचा धुडगूस
By Admin | Updated: July 24, 2014 22:31 IST2014-07-24T22:15:50+5:302014-07-24T22:31:12+5:30
नांगरतास परिसरातील स्थिती : ऊस, भात, केळी बागायतींचे लाखोंचे नुकसान

हत्तींच्या कळपाचा धुडगूस
आंबोली : येथील नांगरतास गडदूवाडी परिसरात तीन हत्तींच्या कळपाने ऊस व भातशेतीत अक्षरश: धुडगूस घालून तीस ते पस्तीस लाखांचे नुकसान केले. कृष्णा आवटे व बाळकृष्ण आवटे यांच्या घराशेजारील झाडे त्यांच्या घरावर पाडली.
माणगाव परिसरात हत्तींचा धुडगूस सुरु असतानाच आंबोलीतील हत्तींकडे वनविभागाने दुर्लक्ष केले आहे. आंबोलीत हत्ती असल्याचे माहीत असूनही वनविभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे. अगोदरच गवे, रानडुक्कर, सांबर यासारख्या प्राण्यांकडून शेती वाचविताना नाकीनऊ येत असतानाच त्यातच हत्तींची भर पडल्याने शेतकऱ्यांचे पुरते कंबरडेच मोडले आहे. वनक्षेत्रपाल आर. एस. जेअरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यावेळी काही शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घालून पंचनामे करुन सहा महिन्यांनी नुकसान भरपाई न देता त्वरित नुकसान भरपाई तीही पंधरा दिवसांच्या कालावधीत देण्यात यावी, अशी मागणी केली. तर काही शेतकऱ्यांनी तर आम्ही हत्तींना कायमचे नांदवून घ्यायला तयार आहोत. परंतु, आमची कर्जमाफी करावी, अशी मागणी केली. तर एका शेतकऱ्याने आपल्याला यावर्षी शेतीकर्ज भरता आले नाहीतर आत्महत्या करायची वेळ आल्याचे आक्रोश करत सांगितले. यावर पर्याय म्हणून वनक्षेत्रपाल व शेतकरी यांनी सामंजस्याने बसून तोडगा काढण्याचे ठरविले. दोन वनरक्षक कायमस्वरुपी नांगरतास परिसरात गस्तीसाठी देण्याचे ठरविले. शेतकऱ्यांना हत्तीपासून सावध करणारे सूचना फलक लावणे व शेतकऱ्यांना सुरक्षितस्थळी येजा करण्यासाठी संरक्षण पुरविणे, असे निर्णय घेण्यात आले.
हत्तींकडून प्रवीण आवटे, संध्या आवटे, कृष्णा आवटे, अशोक नार्वेकर, चंद्रकांत गावडे, प्रदीप आवटे, संतोष गावडे, विठू जंगले, संतोष आवटे, बाळकृष्ण गावडे, कृष्णा गावडे, नीलेश कालेलकर, देवू यमकर, बाळकृष्ण आवटे, दिलीप जाधव, सुनील नार्वेकर, प्रशांत आवटे, प्रिया आवटे, चंद्रकांत महादेव गावडे, प्रविण ओगले, अरुण ओगले, वा. ध. पटकारे, शाहू खरात, विठ्ठल गावडे, किज्मा डिसोजा यांच्या ऊस बागायतीचे व केळी बागायतींचे सुमारे १00 एकरातील तीस ते पस्तीस लाखांचे नुकसान करण्यात आले. हत्तींकडून काही ठिकाणचा खोडाचा ऊस मुळासकटच उपटून टाकण्यात आला आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षातील उत्पन्नच संपलेले असल्याचे कृष्णा आवटे यांनी सांगितले. भविष्यात हत्तींकडून असेच नुकसान सुरु राहिले तर आकडा कोटीच्या घरात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
येथे सुमारे ४0 लाख रुपये खर्च करुन हत्तींसाठी काढण्यात आलेला चर म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक आहे. ज्याठिकाणी चर मारलेला नाही, त्याठिकाणावरुन हत्ती थेट भरवस्तीत येत आहेत. आणि चराच्या कामातही प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. काही ठिकाणी दोन फूट तर काही ठिकाणी १ फूट अशाप्रकारे सोयीनुसार चर मारण्यात आलेला आहे. तज्ज्ञांनी चर मारल्यास हत्ती आणि शेतकऱ्यांतील संघर्ष वाढण्याची भीती चर मारण्यापूर्वीच व्यक्त केली होती. परंतु, तरिही चर मारण्यात आले. हत्तींपासून बचाव करण्यासाठी येथील वनविभागाकडे गाडी, साधनसामुग्री आणि मनुष्यबळही नसल्याचे दिसून येत आहे. पुढील दोन महिन्यात ऊस कापणीस येणार होता, त्यामुळे शेतकरी हताश झाले आहेत. त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हत्तींनी हिरावून घेतला आहे. नुकसान भरपाई न मिळाल्यास १५ आॅगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना तत्काळ मदतीची गरज
-गतवर्षीही हत्तींकडून शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. मात्र, शासनाच्या भोंगळ कारभारामुळे अद्यापही या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे यावर्षीतरी केवळ वनविभागाच्या पंचनाम्यांवरच नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
-हत्तींनी नुकसानी केल्याचे सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांना कळताच त्यांनी तत्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली आहे. तसेच गस्त घालण्यासाठी वनविभागाला गाडीही पुरविली आहे.
-जिल्ह्यातील हत्तीबाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांसह मंत्र्यांशी चर्चा करुन मार्ग निघत नसल्यास येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह मंत्रालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा कृष्णा आवटे व दत्तू नार्वेकर यांनी दिला आहे. यावेळी काही शेतकऱ्यांनी वनविभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांसमोर हत्तींना आमच्या शेतात राहू द्या, आमची सर्व कर्जमाफी करावी, अशी मागणीही केली.