चार पदांसाठी नोव्हेंबरला निवडणूक
By Admin | Updated: October 1, 2015 00:28 IST2015-09-30T23:02:43+5:302015-10-01T00:28:24+5:30
रत्नागिरी नगर परिषद : अपात्रतेच्या कारवाईनंतर घडामोडींना वेग

चार पदांसाठी नोव्हेंबरला निवडणूक
रत्नागिरी : येथील नगर पालिकेच्या चार नगरसेवकांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरविल्याने त्यांच्या रिक्त जागांसाठी अखेर निवडणूक जाहीर झाली आहेप्रीती सुर्वे, स्मितल पावसकर, मुनाज जमादार आणि बाळू साळवी या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीवेळी पक्षाचा व्हीप नाकारून शिवसेनेचे उमेदवार संजय साळवी यांनी मतदान केले. त्यामुळे राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद सुदेश मयेकर यांनी त्यांच्या अपात्रतेची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यावर सुनावणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी या चौघांनाही अपात्र ठरविल्याचा निर्णय दिला होता.या निर्णयाविरोधात या चौघांनीही उच्च न्यायालयाकडे दाद मागितली. यावर सुनावणी सुरू असतानाच निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार या चार रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या चौघांच्या प्रभाग क्र. २मधील ब आणि ड, ४ मधील अ आणि ड, अशा चार जागांसाठी १ नोव्हेंबरला मतदान घेण्याचे जाहीर केले आहे.
१ ते ८ आॅक्टोबर या कालावधीत अर्ज दाखल करणे, ९ आॅक्टोबर अर्जाची छाननी, १९ आॅक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत, २६ आॅक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करणे तर १ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. २ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून नगर पालिकेच्या कार्यालयात मतमोजणी होणार आहे.
काही दिवसानंतर या चार नगरसेवकांच्या अपात्रतेसंदर्भात निकाल लागणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या निकालात काय होते, याकडेही राजकीय मंडळींचे लक्ष लागून राहिले आहे.(प्रतिनिधी)