दोडामार्गात होणार पंचरंगी अन् अटीतटीची निवडणूक

By Admin | Updated: October 6, 2014 22:37 IST2014-10-06T21:28:35+5:302014-10-06T22:37:48+5:30

आपली ताकद किती आहे, हे निकालाअंती स्पष्ट होणार आहे.

Election to the five-cornered election will take place in Doda | दोडामार्गात होणार पंचरंगी अन् अटीतटीची निवडणूक

दोडामार्गात होणार पंचरंगी अन् अटीतटीची निवडणूक

शिरीष नाईक -कसई दोडामार्ग --विधानसभा निवडणुकीत आघाडी व महायुतीत बिघाडी झाल्याने या निवडणुकीमध्ये प्रमुख चार पक्ष व मनसे रिंगणात असल्याने ही लढत पंचरंगी आणि अटीतटीची होणार असल्याचे चित्र आहे. दोडामार्गात भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना व मनसे यांचा प्रचार जोरात सुरु आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार हा दोडामार्गातील असल्याने त्यांना स्थानिक असल्याचा फायदा जास्त होणार आहे. दोडामार्ग तालुक्यातील मतदारांच्या मतांमध्ये यावेळी विभागणी होणार हे नक्की. त्यामुळे कोणता पक्ष सक्षम आहे, हे प्रत्येक पक्षाला समजणार असल्याने खऱ्या अर्थाने ही निवडणूक पक्षीय असणार आहे. त्याचबरोबर आपली ताकद किती आहे, हे निकालाअंती स्पष्ट होणार आहे.
निवडणूक प्रचाराला केवळ आठवडाभर उरल्याने हा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे सध्या सारेच पक्ष प्रचारसभांबरोबरच गावभेटीवर भर देत आहेत. त्यामुळे सध्या प्रचार चांगलाच रंगात आला आहे. साऱ्यांनीच आता रात्रीचा दिवस करत प्रचाराला सुरूवात केली आहे.
यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना हे चारही प्रमुख पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे हात, घड्याळ, धनुष्यबाण व कमळ या निशाणी मतदारापर्यंत पोहोचल्या असल्या, तरी हात व धनुष्यबाण या निशाणी मतदारांना माहीत आहेत. यावेळी ही चारही चिन्ह मतदारयंत्रावर असल्याने या मतदारसंघातील मतदारांमध्येही संभ्रमावस्था निर्माण होणार आहे.
निवडणूक रिंगणामध्ये काँग्रेसचे बाळा गावडे, राष्ट्रवादीचे सुरेश दळवी, भाजपाचे राजन तेली, शिवसेनेचे दीपक केसरकर, मनसेचे परशुराम उपरकर असणार आहेत. राष्ट्रवादीचे सुरेश दळवी यांना अचानक तिकीट मिळाल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना फारच कमी वेळ मिळणार आहे. दळवी हे स्थानिक उमेदवार असल्याने ते याचा फायदा कितपत उठवू शकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तालुक्यात याआधी सेना-भाजपच्या पक्षांची ताकद मोठी होती.
पंचायत समिती त्यांच्या ताब्यात होती. असे असताना भाजपाने शिवसेनेला धक्का देत स्वबळावर भाजपाचा सभापती व उपसभापती पदावर वर्णी लावल्याने या भागात राजेंद्र म्हापसेकर किंगमेकर ठरले आहेत. पंचायत समितीचे तीन सदस्य व एक जिल्हा परिषद सदस्य आहे. तर राष्ट्रवादीकडे दोन सदस्य व काँग्रेसकडे एक सदस्य व दोन जिल्हा परिषद सदस्य आहेत. काँग्रेस सदस्य हे शिवसेनेतून निवडून आले होते. त्यामुळे या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मतांची विभागणी झाली असली, तरी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व मनसे अशा क्रमवारीने मताची विभागणी होण्याची शक्यता आहे.
प्रत्येक पक्षाला आपल्या उमेदवाराचा प्रचार करावा लागणार आहे. त्यामुळे आपल्या उमेदवाराचे चिन्ह मतदारापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर आली आहे. आधी धनुष्यबाणाची निशाणी घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांना आता कमळाची निशाणी घेऊन जावी लागणार आहे. यावेळी मतदारांची समजूत कशी काढणार, हा यक्ष प्रश्न कार्यकर्त्यांसमोर उभा ठाकला आहे. या निवडणुकीत पक्षाची ताकद आजमावण्यासाठी मतदारांना खूश ठेवण्यावर पक्षांचा अधिक भर असणार आहे, हेही तेवढेच खरे आहे. आपली ताकद वाढली आहे, म्हणून काही पक्षांनी युत्या तोडल्या खऱ्या, पण पक्षाची खरी ताकद निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Web Title: Election to the five-cornered election will take place in Doda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.