निवडणुकीचे नागरिकांना कुतूहल
By Admin | Updated: September 30, 2015 00:09 IST2015-09-29T21:42:30+5:302015-09-30T00:09:41+5:30
वैभववाडी-वाभवे नगरपंचायत : अत्यल्प मतदानामुळे प्रत्येक मत ठरणार निर्णायक

निवडणुकीचे नागरिकांना कुतूहल
वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणूकीच्या निमित्ताने येथील नागरिकांना कुतूहल आहे. आकाराने आणि लोकसंख्येनेही लहान असलेल्या या नगरपंचायतीच्या १७ प्रभागात केवळ १ हजार ४७६ मतदार आहेत. प्रभाग क्रमांक ११ हा सर्वाधिक १३0 मतदार संख्येचा खुल्या प्रवर्गाचा तर नागरिकांच्या मागास प्रवर्गातील स्त्रीसाठी राखीव असलेला मोठ्या क्षेत्रफळाचा प्रभाग क्रमांक १३ कोंडवाडी परिसर हा फक्त ६२ मतदार संख्येचा सर्वात लहान प्रभाग आहे. १७ पैकी केवळ ३ प्रभागातील मतदारांची संख्या १00 च्या वर आहे.ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाले म्हणजे नेमके काय याबाबत निम्म्याहून अधिक मतदारांना कुतूहल आहे. नगरपंचायतीमुळे सुविधा काय आणि कधी मिळतील हे स्पष्ट नसले तरी कर वाढणार या ऐकीव माहितीने सामान्य नागरिक काहिसे शहारले आहेत. दोनशे अडीचशे मीटर लांबीच्या बाजारपेठेत, स्टेट बँक परिसर आणि सज्जनकाका नगर एवढ्याच भागाला शहराचा ‘लूक’ दिसून येतो. त्यामुळे वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीपुढे शहराच्या विकासाचे मोठे आव्हान दिसत आहे.
वाभवे-वैभववाडी नगरपंचायत कार्यक्षेत्रात माईणकरवाडी, तांबेवाडी, गावठण आणि कोंडवाडी या चार वस्त्या वगळता अन्य भागात स्थानिकांपेक्षा नोकरदार, व्यापारी आणि वास्तव्यासाठी आलेल्या मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे स्थानिकांपेक्षा इतरांचा वरचष्मा येथे दिसून येतो. त्यामुळे पहिल्या निवडणुकीतही स्थानिकांपेक्षा इतरांचा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत वेगळी समिकरणे जुळवली जाण्याची चिन्हे आहेत. नगरपंचायतीची पहिली निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी वरकरणी अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी प्रत्येक राजकीय पक्षांचे सत्तेचे इरादे आणि पहिल्यांदा नगरसेवक होण्यासाठी अनेकांच्या असलेल्या आकांक्षाना आवर कोणी घालायचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. काही आरक्षित जागांवरील निवडी बिनविरोध होण्याची शक्यता आहे. मात्र, सर्वसाधारण स्त्री आणि खुल्या जागांच्या प्रभागांमध्ये ‘कांटे की टक्कर’ होणार आहे. नगरपंचायत कार्यक्षेत्रातील बहुतांश बाहुबली एक, पाच आणि अकरा यातीन प्रभागात तुटून पडण्याची चिन्हे दिसत
आहेत. (प्रतिनिधी)
‘गाव विकास आघाडी’ बाबत चर्चेची गुऱ्हाळे
आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणूकीत पूर्ण ताकदीने उतरणार आहे. त्यासाठी त्यांनी जूनपासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेना, भाजप आणि आरपीआय अशी महायुती निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असे सेना, भाजपकडून सांगितले जात असले तरी आरपीआय कडून अद्याप तसे कोणतेही सुतोवाच नाहीत. शिवाय ‘गाव आघाडी’ करण्याच्या उद्देशाने स्थानिकांमध्ये चर्चेची गु-हाळे सुरू आहेत.
साठीतले उत्सुक
नगरसेवक म्हटले की नजरेसमोर छबी उभी राहते ती पन्नाशीच्या आतील तरुण रक्ताची. मात्र, वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणूकीत नशीब अजमावून नगरसेवक बिरुद मिळविण्यासाठी वयाच्या साठीत पोहोचलेले सात-आठ जण निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत. त्यातही काहीजण पक्षाची उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. या साठीतल्या उत्सुकांना कोण कसा आणि किती प्रतिसाद देतो यावर सर्व अवलंबून आहे.
८३ मतदार वाढले
वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीची घोषणा झाली. तेव्हा मतदार संख्या १ हजार ३९३ एवढी होती. त्यामध्ये ८३ मतदारांची वाढ होऊन वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी १ हजार ४७६ मतदारांचा आकडा निश्चित करण्यात आला आहे. या यामध्येच ७४३ पुरुष व ७३३ स्त्री मतदारांचा समावेश आहे. पुरुषांपेक्षा स्त्री मतदारांची संख्या १0 ने कमी आहे.