क्रीडा साहित्य चोरीप्रकरणी आठ अल्पवयीन मुले ताब्यात
By Admin | Updated: November 24, 2014 23:11 IST2014-11-24T22:08:32+5:302014-11-24T23:11:02+5:30
कुडाळ येथील बाल न्यायालयात हजर केले असता प्रत्येकी ५ हजारांच्या वैयक्तिक बाँडवर त्यांची मुक्तता करण्यात आली

क्रीडा साहित्य चोरीप्रकरणी आठ अल्पवयीन मुले ताब्यात
ओरोस : जिल्हा क्रीडा विभागाने येथील क्रीडा संकुलात ठेवलेल्या सुमारे ७५ हजार ५४७ रुपये एवढ्या किंमतीच्या साहित्याच्या चोरी प्रकरणी पोलिसांनी आठ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांना कुडाळ येथील बाल न्यायालयात हजर केले असता प्रत्येकी ५ हजारांच्या वैयक्तिक बाँडवर त्यांची मुक्तता करण्यात आली आहे. तपासकामात पोलिसांना सहकार्य करण्याची अटही घालण्यात आली आहे.जिल्हा क्रीडा विभागाच्यावतीने क्रीडा संकुल येथे लाखो रुपयांचे क्रीडा साहित्य वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी अनेक खेळाडू खेळण्यासाठी येत असतात.
मागील काही महिन्यांच्या कालावधीत चार स्किपिंग, एक फुटबॉल नेट, पाच व्हॉलीबॉल, तीन हॉकीबॉल, दोन थ्रो बॉल, ४२ लॉन टेनिस, २६ क्रिकेट बॉल, पाच क्रिकेट स्टंप, सहा बॅट, चार फुटबॉल, पाच बॅडमिंटन, दोन रॅकेट, दोन हार्डबॉल, सात बास्केटबॉल, दोन हँडग्लोज आदी साहित्य क्रीडा संकुलातून चोरीस गेले होते.
याबाबत क्रीडा अधिकारी स्नेहल जगताप यांनी ओरोस पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार नोंदविली होती. तसेच तपास सुरुहोता. या प्रकरणी क्रीडा संकुलात खेळायला येणाऱ्या आठ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र तपासात अडचण निर्माण होऊ नये यासाठी या मुलांची नावे पोलिसांनी जाहिर केलेली नाहीत. या प्रकरणात आणखीन कोणाचा सहभाग आहे का याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कोकरे, हवालदार पिळणकर अधिक तपास करीत
आहेत. (वार्ताहर)