केसरकरांचा प्रभाव सावंतवाडीपुरता
By Admin | Updated: August 3, 2014 23:34 IST2014-08-03T23:23:14+5:302014-08-03T23:34:12+5:30
रमेश कदम : कुठे आहे सिंधुदुर्गात दहशतवाद; जिल्ह्यात राष्ट्रवादीवर प्रेम करणारी जनता

केसरकरांचा प्रभाव सावंतवाडीपुरता
सावंतवाडी : शिवसेनेत कोण जाणार आणि कोण नाही, याची खातरजमा ५ आॅगस्टनंतरच होईल. मात्र, आमदार दीपक केसरकरांचा प्रभाव हा सावंतवाडीपुरता असून अन्य तालुक्यात त्याचा परिणाम होणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशतवादच नाही, असे मतही त्यांनी मांडले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी पक्ष निरीक्षक बाबाजी जाधव, माजी आमदार शिवराम दळवी, जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, अबिद नाईक, उल्हास गावडे, नगरसेवक राजू बेग, सुनिल लिंगवत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कदम म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादीवर प्रेम करणारी माणसे आहेत. त्यामुळे पक्ष कोणीही सोडणार नाही. आमदार केसरकर यांनी लोकसभा निवडणुुकीत धनुष्यबाणावर शिक्का मारण्यास सांगितला. त्यावेळी त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. आता यापुढे पक्ष जोमाने वाढविण्यासाठी प्रयत्न राहणार आहे.सिंधुदुर्गात आमच्या वाट्याला सावंतवाडी मतदारसंघ आला असून, येथून आम्ही निवडणूक लढवणार आहे. कोणाला उमेदवारी द्यायची, हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, त्यावर भाष्य करणार नाही. आमदार केसरकर यांचा प्रभाव सावंतवाडीपुरता आहे. इतर तालुक्यात पक्षाचे सर्व कार्यकर्ते भेटून बाजू मांडत आहेत. त्यांना ताकद देण्याचे काम यापुढे करू. पक्षात राहून कोणीही केसरकरांना मदत करणार नाही, असा दावाही यावेळी त्यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीत केसरकर यांच्या कोअर कमिटीत असलेल्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाणार नसल्याचे स्पष्ट केले. यापुढे पक्षाच्या सतत बैठका घेऊन पक्षाला ताकद देण्याचे काम केले जाईल. जिल्ह्यात १५ आॅगस्टपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत निर्धार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यातून पक्षाला बळकटी मिळेल, असेही यावेळी त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)