शैक्षणिक प्रक्रिया ठप्प
By Admin | Updated: December 2, 2014 00:30 IST2014-12-01T21:44:28+5:302014-12-02T00:30:16+5:30
महेंद्र नाटेकर : संस्थाचालकांच्या सभेत आरोप

शैक्षणिक प्रक्रिया ठप्प
कणकवली : इंग्रजी शिक्षणाचे स्तोम माजवल्यामुळे शैक्षणिक प्रक्रिया ठप्प झाली आहे. विनाअनुदान तत्त्वामुळे भ्रष्टाचार बोकाळला असून गरीब विद्यार्थी शिक्षणाच्या बाहेर फेकला जात आहे. शाळा अंतर्गत २० टक्के गुणदान योजनेमुळे शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. महाराष्ट्रात शैक्षणिक अराजक माजले असून त्याला बेजबाबदार राज्यकर्तेच जबाबदार आहेत, अशी टीका शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य महेंद्र नाटेकर यांनी केली आहे.
जांभवडे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक, पालक व संस्थाचालकांची नुकतीच सभा आयोजित केली होती. यावेळी प्रा. नाटेकर बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन सुभाष मडव होते. प्रा. नाटेकर म्हणाले, शिक्षण देणे म्हणजे सुसंस्कार करणे, मातृभाषेतून दिलेले शिक्षण विद्यार्थ्यांच्या हृदयाला भिडते. मुलांच्या मनावर सुसंस्कार होतात. त्यांच्यातील सुप्तगुण विकसीत होऊन विविधांगी व्यक्तिमत्त्व खुलते. शिक्षणातून माणूस घडविला जातो.
नाटेकर म्हणाले, विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी परीक्षा रद्द करणे, शिक्षणावरील खर्च वाया जाऊ नये म्हणून तसेच शैक्षणिक दर्जा उंचवावा म्हणून प्रत्येक विषयात प्रत्येक विद्यार्थ्याला २० टक्के गुण देणे हे अशैक्षणिक व अडाणीपणाचे निदर्शक आहे. शिक्षकेतर अनुदान दिले जात होते म्हणून विशेषत: आर्थिक मागासलेल्या कोकणातही हायस्कूल, महाविद्यालयेही सुरू झाली. परंतु ते अनुदान मायबाप सरकारने बंद केल्याने संस्थाचालकांना शैक्षणिक साहित्य खरेदी करता येत नाही. त्यामुळे ही शैक्षणिक दर्जा खालावत आहे. शैक्षणिक अराजक मोडून काढून उच्च शैक्षणिक दर्जा निर्माण करायचा असेल तर इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करून मराठी माध्यमाच्या शाळांतून इंग्रजी विषय शिकवा. राष्ट्राचे भवितव्य शिक्षणावर अवलंबून असल्याने लहरी राजकारण्यांवर अवलंबून शिक्षण खाते न ठेवता स्वायत्त शिक्षण तज्ज्ञांच्या मंडळाकडे सुपूर्द करा. बेजबाबदार राज्यकर्त्यांच्या हाती शिक्षण म्हणजे माकडाच्या हाती कोलीतच दिल्यासारखे आहे, असा आरोप त्यांनी केला. सुभाष मडव यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्राचार्य वागरे यांनी केले. (प्रतिनिधी)
जनता फार काळ सहन करणार नाही
ज्ञानविज्ञानासाठी जागतिक भाषा म्हणून मराठी माध्यमांच्या शाळांतून अनिवार्य भाषा म्हणून इंग्रजी अध्ययन- अध्यापन झाले पाहिजे. मात्र मातृभाषेचे स्थान इंंग्रजी घेऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती असताना आज महाराष्ट्रामध्ये इंग्रजी माध्यमाचे पेव फुटले आहे ते नोकरी-धंदा मिळवून उदरभरण करण्याच्या आशेने, मृगजळाने. राज्यकर्ते आणि दांभिक संस्थाचालक इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवून स्वत:च्या तुंबड्या भरत आहेत. सूज्ञ जनता हे फार काळा सहन करणार नाही, असे ते म्हणाले.