शिक्षणातून देशाचा विकास शक्य

By Admin | Updated: June 23, 2014 01:37 IST2014-06-23T01:30:26+5:302014-06-23T01:37:13+5:30

दिव्यदर्शनदास स्वामी : पडेल विद्यामंदिरात शैक्षणिक साहित्य वाटप

Education is possible through country of education | शिक्षणातून देशाचा विकास शक्य

शिक्षणातून देशाचा विकास शक्य

पुरळ : शिक्षणाच्या माध्यमातून देशाचा विकास होऊ शकतो. यामुळे शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिक्षणाची प्रगती, शिक्षणाचा ध्यास आणि शिक्षणाची आस ही विद्यार्थ्यांनी आत्मसात केली पाहिजे. स्वामी नारायण गादी संस्थानच्या शाळेमधून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षण घेतले आहे. यामुळे या संस्थानच्या माध्यमातून मोदींसारखे विद्यार्थी घडून देशसेवेचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून करायचे आहे, असे मत स्वामी नारायण गादी संस्थान, महालक्ष्मीचे महंत दिव्यदर्शनदास स्वामी यांनी व्यक्त केले.
पडेल ग्रामसुधारणा मंडळ मुंबई संचलित श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पडेल येथे स्वामी नारायण गादी संस्थान, महालक्ष्मी ट्रस्टच्यावतीने विद्यार्थ्यांना सुमारे १० लाख रुपयांच्या शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. स्वामी नारायण गादी संस्थान मुंबई या संस्थेच्या माध्यमातून १५०० विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांचे शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष सुभाष पाटणकर, कार्याध्यक्ष अशोक पाटणकर, संदीप वारीक, मुख्याध्यापक करंजेकर, विकास दीक्षित, जितेंद्र लोकेगांवकर, हिराचंद तानवडे, संस्थेचे पदाधिकारी, स्वामी नारायण गादी संस्थानचे सर्व पदाधिकारी, अनुयायी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना महंत दिव्यदर्शनदासजी स्वामी यांनी सांगितले की, शिक्षण क्षेत्राची प्रगती व शिक्षण क्षेत्राला वाव मिळण्यासाठी संस्थानमार्फत अनेक उपक्रम राबविले जात आहेत. पडेलसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याची संधी मिळाली. यापुढेही आपण येथील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर देऊ असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी पडेल माध्यमिक विद्यामंदिर, कनिष्ठ महाविद्यालय, पूर्ण प्राथमिक शाळा पुरळ हुर्शी, तिर्लोट, पडेल, पडेल गावकरवाडी, नरगोलवाडी, नाडण धनगरवाडी तसेच सौंदाळे हेळदेवाडी येथील सुमारे १५०० शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप महंत दिव्यदर्शनदासजी स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तालुक्यात पहिली आलेली पडेल कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी पूजा मोंडकर हिला संस्थानच्यावतीने ११ हजार रुपयांचे रोख रकमेचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी याच महाविद्यालयातील दहावी व बारावीमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने विद्यामंदिरात प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन पडेल ग्रामसुधारणा मंडळ, मुंबई या संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेली संस्था म्हणजे पडेल ग्रामसुधारणा मंडळ ही संस्था आहे. अल्पावधीतच या संस्थेने जिल्ह्यामध्ये अत्याधुनिक संगणक कक्ष असलेले माध्यमिक विद्यामंदिर म्हणून आदर्श निर्माण केला आहे. या कार्यक्रमाला पडेल गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फडके यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Education is possible through country of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.