शिक्षण सभापतीच शिक्षक पुरस्कारापासून दूर
By Admin | Updated: September 5, 2014 23:25 IST2014-09-05T21:59:36+5:302014-09-05T23:25:47+5:30
शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत नाराजी

शिक्षण सभापतीच शिक्षक पुरस्कारापासून दूर
सिंधुदुर्गनगरी : शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दरवर्षी विशेष कार्यक्रम आयोजित करून जिल्हा परिषदेमार्फत सन्मानित करण्यात येते. परंतु यावर्षी या सोहळ्याचा शिक्षण विभागाला विसर पडला आहे. उशिराने जाग आलेल्या शिक्षण विभागाने ४ सप्टेंबरला घाईगडबडीत पुरस्कारप्राप्त शिक्षकांची यादी जाहीर केली. मात्र, चक्क शिक्षण सभापती प्रकाश कवठणकर यांनाच यापासून दूर ठेवल्याने त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
राज्यात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. गेली दोन वर्षे प्रमोद कामत हे शिक्षण सभापती असताना शिक्षक दिनीच आदर्श शिक्षकांना पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करून शिक्षकांचा सन्मान करण्यात आला होता. शिक्षण विभागाच्या कासवगती कारभारामुळे दरवर्षी उशिराने होणारा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा शिक्षक दिनी ५ सप्टेंबर रोजीच व्हावा असा आग्रह धरत गेली दोन वर्षे पार पाडला होता. शिक्षण विभागाचा ‘उशिरा’चा पायंडा मोडित काढला होता आणि यापुढे ‘शिक्षक दिनी’च आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्याची प्रथा कायम ठेवा असे आदेश दिले होते. तसा ठरावही करण्यात आला होता. परंतु शुक्रवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन असल्याची अचानक जाग आल्याने शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर यांनी चक्क ४ सप्टेंबर रोजीच पुरस्कारप्राप्त शिक्षकांची यादी जाहीर करून घाईगडबडीत सोपस्कार पूर्ण केला. याबाबत शिक्षण सभापती प्रकाश कवठणकर यांना अनभिज्ञ ठेवले.
थेट वर्तमानपत्रांकडे याद्या देऊन आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केल्याबाबत सभापती कवठणकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शिक्षणाधिकारी धाकोरकर यांना धारेवर धरले.
दरवर्षी शिक्षक दिनी आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. त्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येते. मात्र, शिक्षण विभागाच्या कासवगती कारभारामुळे आजच्या शिक्षक दिनी पुरस्काराचे वितरण होऊ शकले नाही. याबाबत शिक्षण क्षेत्रात नाराजी पसरली आहे. शिक्षक दिनाची उशिराने जाग आलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांनी ४ सप्टेंबरलाच शिक्षण सभापतींसह जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना डावलून घाई गडबडीत आदर्श शिक्षक पुरस्कार यादी जाहीर करून शिक्षकांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले असले तरी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना डावलून त्यांचा रोष ओढवून घेतला आहे.
शिक्षण विभागाकडून ५ सप्टेंबर या शिक्षक दिनापूर्वीच ४ सप्टेंबरला घाईगडबडीत पुरस्कारप्राप्त शिक्षकांची यादी थेट वर्तमानपत्रांकडे देऊन जाहीर केली असली तरी दरवर्षी शिक्षक दिनी होणारा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम मात्र लांबणीवर पडला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत शिक्षण क्षेत्रात तीव्र नाराजी व्यक्त होत
आहे. (प्रतिनिधी)