‘अर्थकारण’ चव्हाट्यावर

By Admin | Updated: July 17, 2014 23:09 IST2014-07-17T23:01:12+5:302014-07-17T23:09:28+5:30

पंचायत समिती जिल्ह्यात : पांढरपट्टेंना शिक्षक संघटनेचे निवेदन

'Economy' on the whim | ‘अर्थकारण’ चव्हाट्यावर

‘अर्थकारण’ चव्हाट्यावर

सिंधुदुर्गनगरी : पंचायत राज समितीचे सिंधुदुर्गात आगमन झाले असून जिल्हा परिषदेने या समितीचे स्वागत केल्यानंतर गुरुवारी जिल्हा परिषद भवनात या समितीचे कामकाज सुरु झाले. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सवर्गातील सर्वच कर्मचाऱ्यांकडून वर्गणी गोळा करण्यात आली असून त्याला सर्वच शिक्षक संघटनांनी मात्र नकार दिला आहे. यापूर्वी ‘पीआरसी’साठी गोळा केलेला वर्गणीचा हिशोब द्या, असे लेखी पत्रच शिक्षक संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना दिले आहे. त्यामुळे या ‘अर्थकारणाचा’ विषय चव्हाट्यावर आला आहे.
विधीमंडळाच्या २६ सदस्यीय समितीचे प्रमुख आमदार जयप्रकाश दांडेकर यांच्यासह सात आमदार सदस्यांचे आगमन झाले असून गुरुवारपासूनच या समितीच्या कामकाजास जिल्हा परिषद भवनास प्रारंभ झाला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषद पदाधिकारी यांनी या समितीचे स्वागत केले. त्यानंतर गोपनीय बैठकीस प्रारंभ झाला. दिवसभर जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही बैठक सुरु होती. या समितीमध्ये आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार दिलीप माने, आमदार राजकुमार बडोळे, आमदार विठ्ठल काळे, आमदार शोभाताई फडणवीस, आमदार दिवाकर रावते आदींनी सहभाग घेतला आहे. अन्य काही विधान परिषद सदस्य शुक्रवारपर्यंत दाखल होतील असेही सांगण्यात आले.
यापूर्वी पंचायत राज समितीचा दौरा दोनवेळा रद्द झाला होता. मात्र त्यावेळी अशाच पद्धतीने पीआरसीच्या नावाखाली शिक्षक, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षणसेवक यांच्याकडून वर्गणी गोळा करण्यात आली होती. ती रक्कम काय झाली, त्याचा हिशोब द्या अशी मागणी शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लेखी पत्र देत केली आहे.
सर्वच शिक्षकांनी हा निधी देण्यास आता विरोध केल्याने व शिक्षकांनी या विरोधात तोंड उघडल्याने या ‘अर्थकारणाचा’ विषय आता चव्हाट्यावर आला आहे. मात्र जिल्हा परिषदेतील अन्य कर्मचाऱ्यांनी सवर्गनिहाय आपला हिस्सा प्रशासनाकडे जमा केल्याचे वृत्त आहे.
शुक्रवारी ही समिती जिल्हाभर फिरणार आहे. जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्यकेंद्रे तसेच जिल्ह्यातील पंचायत समित्या यांना भेटी देणार आहे. गुरुवारी सन २००८-०९ च्या वार्षिक लेखा परीक्षण अहवालावर चर्चा व
अधिकाऱ्यांची साक्ष झाली व शनिवारी सन २०१०-११ च्या वार्षिक प्रशासकीय अहवालाची साक्ष जिल्हा परिषदेमध्ये होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Economy' on the whim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.