कोकण किनारपट्टीला प्रदूषणाचे ग्रहण
By Admin | Updated: January 3, 2015 00:14 IST2015-01-02T22:52:48+5:302015-01-03T00:14:47+5:30
नियंत्रण मंडळाचा ठपका : मुरुड, दाभोळ, जयगड, रत्नागिरी, पावसला प्रदूषण कमी

कोकण किनारपट्टीला प्रदूषणाचे ग्रहण
सुभाष कदम : चिपळूण :राज्याला ७२० किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी लाभली आहे. या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचा ठपका समुद्र विज्ञान प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठेवला आहे. मात्र, रायगड जिल्ह्यातील काही भाग रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील किनारपट्ट्या तुलनेने कमी प्रदूषित असल्याचे अहवालात म्हटले आहे.
वाढते औद्योगिकीकरण, घरगुती सांडपाणी, औद्योगिक वसाहतीचे सांडपाणी, खत कारखाने, ऊर्जा प्रकल्प आदीच्या सांडपाण्यामुळे समुद्राचे पाणी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होऊ लागले आहे. वाढते शहरीकरण, झपाट्याने होणारे औद्योगिकीकरण आणि कोणत्याही प्रक्रियेविना समुद्राच्या पाण्यात सोडण्यात येणारे रासायनिक प्रदूषित घटक यामुळे मासेमारी व समुद्रातील जैवविविधतेवर परिणाम झाला आहे. राज्यातील १८ खाड्या व नद्यांच्या मुखाजवळील प्रदूषण चिंताजनक आहे.
मुंबई उपनगर, तारापूर, वसई, मनोरी, वर्सोवा, वांद्रे, माहीम, वरळी, ठाणे, पाताळगंगा व अलिबाग येथील किनारपट्टी अधिक प्रदूषित आहे. वाढत्या औद्योगिकीकरणाबरोबरच रासायनिक व तेल कंपन्यांचे दूषित पाणी, गटार व नाल्यातून येणारे सांडपाणी याचा परिणाम मुंबई, ठाणे आणि परिसरातील सागरी जैवविविधतेवर होत आहे. मुंबईपासून ३० ते ३५ किलोमीटरपर्यंत समुद्रात प्राणवायू नसल्याने माशांची पैदास होत नाही. रासायनिक प्रक्रिया न करता नद्या किंवा खाड्यांमध्ये सोडलेले पाणी जलचरांसाठी धोकादायक झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड आणि जैतापूर येथील औष्णिक प्रकल्पामुळे जलचरांचे प्रमाण घटत चालले आहे. शहरीकरणासाठी समुद्रात टाकण्यात येत असलेला भराव व प्रदूषणामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. मुंबई व ठाणे परिसरातील अनेक खाड्यांचे अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याने भविष्यात हा धोका वाढणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात औद्योगिकीकरणाचे प्रमाण कमी असल्याने हा किनारा काहीअंशी सुरक्षित आहे. मात्र, जैतापूरसारख्या प्रकल्पामुळे व लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणामुळे भविष्यात येथेही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. लोटे औद्योगिक वसाहतीतील सीईटीपी प्रकल्पाबाबत नाराजी आहे. या प्रकल्पाचा स्थापनेपासून मेंटेनन्स झालेला नाही. येथील पंखे गंजलेले आहेत. त्यामुळे सांडपाणी घुसळण्याची प्रक्रिया नीट होत नाही. सीईटीपी मानके पाळत नसल्याने रासायनिक कारखाने किंवा स्थापित उद्योगांना विस्तारिकरणाची परवानगी नाकारण्यात आली आहे. सांडपाणी दाभोळ खाडीत सोडण्याची सध्याची व्यवस्था आणखी २५ मीटर वाढविण्याची मागणी एमआयडीसीने मंजूर केली आहे. त्याला येथील स्थानिक भोई समाजाचा विरोध आहे. ती पाईपलाईन पूर्णत: काढून टाकून त्यांची प्रक्रिया केल्यानंतरचे पाणी त्यांनाच वापरण्यास सांगावे व खाडी प्रदूषण टाळावे, असे भोई समाजाचे म्हणणे आहे. अखिल भोई समाजाने गेले अनेक वर्ष सुरू ठेवलेला संघर्षर्संपणार कधी असा प्रश्न विचारला जात आहे.
महाराष्ट्राचा समुद्रकिनारा देशात सर्वाधिक प्रदूषित आहे. हे समुद्र विज्ञान प्रदूषण मंडळाच्या अहवालानुसार सिद्ध होते. यावर बंधन घालणे तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, ही काळाची गरज आहे. काही कंपन्या आपले सांडपाणी जबरदस्तीने रस्त्यावर सोडतात किंवा आजूबाजूच्या प्रदेशात टँकरने सोडतात. कंपनीच्या आवारात बोअरवेल खणून भूगर्भात रिचवतात. या गोष्टी थांबल्या पाहिजेत. शासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे, असे द. ना. राजोपाध्ये यांनी सांगितले.
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात तुलनेने कमी प्रदूषित किनारपट्ट्या आहेत. त्यात मुरुड, दाभोळ, गुहागर, जयगड, रत्नागिरी, पावस, विजयदुर्ग, मालवण, वेंगुर्ला, रेडी या किनारपट्ट्यांचा समावेश आहे. या किनारपट्टीवर सध्या प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने व्यक्त होतेय चिंता