विकासाच्या नियोजनात प्रत्येक घटकाचा सहभाग घेणार
By Admin | Updated: July 9, 2015 23:53 IST2015-07-09T23:53:11+5:302015-07-09T23:53:11+5:30
दीपक केसरकर : जिल्हा नियोजन समिती सभागृहाचे उद्घाटन

विकासाच्या नियोजनात प्रत्येक घटकाचा सहभाग घेणार
ओरोस : जिल्ह्याचा विकास हा सर्व समावेशक असावा. नियोजनात प्रत्येक घटकाचा सहभाग सर्वांच्या विचारविनिमयाने होणे आवश्यक आहे. नूतन जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्ह्याच्या विकासाचे केंद्रस्थान बनविणार आहे. जिल्ह्यातील शेवटच्या घटकाचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर असल्याचे मत वित्त, ग्रामविकास व नियोजन राज्यमंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.नूतन जिल्हा नियोजन समिती सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री दीपक केसरकर बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, आमदार वैभव नाईक, आमदार विजय सावंत, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक डी. टी. शिंदे, माजी आमदार पुष्पसेन सावंत यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.केसरकर पुढे म्हणाले, पर्यटन पर्यावरणाशी सांगड घालून पर्यटनावर व कृषी उत्पादनावर आधारीत रोजगार प्रत्येक विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून पाच वर्षात राबविण्यात येणाऱ्या योजना अभ्यासपूर्वक राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व ठिकाणी निश्चितच जिल्हा सुंदर असला पाहिजे अशी कल्पना आपण करतो. ही कल्पना सत्यात उतरली आहे असे पालकमंत्री केसरकर म्हणाले. जिल्हा नियोजन सभागृह हे देखील जुन्याइतकेच नवीन सुंदर साकारले गेले आहे. सुविधा जादा आणि बसण्यास कमी जागा याकरीता नवीन सभागृह आवश्यक होते हे लक्षात घेऊन नवीन बांधण्यात आले.
प्रास्ताविक करताना जिल्हा नियोजनचे अधिकारी हरिबा थोरात म्हणाले, सभागृह हे एकूण ३ कोटी ७२ लाख ३७ हजार इतकी रक्कम खर्च करून उभारण्यात आले आहे. आवाराची ही इमारत मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आली आहे. सभागृह हे मिनी थिएटर्स आहे. कोल्हापूर येथील प्रसिद्ध वास्तु विशारद समीर जोशी यांनी इमारतीचा नेटका आराखडा तयार केला गेला आहे. यामध्ये लाईट प्रोजेक्टर रुम, व्हीआयपी कक्ष, डायस व डायसच्या पाठिमागे सत्ताधारी व विरोधी गटाच्या नेत्यांना दोन स्वतंत्र व्हीआयपी कक्षाची रचना करण्यात आली आहे. यामध्ये पत्रकारांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसेच १४ महनीय व्यक्ती बैठक व्यवस्था सभागृहात २०० खुर्च्या अशाप्रकारे नूतन इमारतीत व्यवस्था करण्यात आल्याचे आपल्या प्रास्ताविकात थोरात यांनी सांगितले.
या कार्यक्रमावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व विशेष परिश्रम घेणाऱ्या व्यक्तींचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)