राजकीय अतिक्रमणाचा सुरूंग

By Admin | Updated: July 21, 2015 00:55 IST2015-07-21T00:52:23+5:302015-07-21T00:55:14+5:30

रत्नागिरी पालिका : भाजप - शिवसेनेत रंगणार कलगी - तुरा

Dynasty of political encroachment | राजकीय अतिक्रमणाचा सुरूंग

राजकीय अतिक्रमणाचा सुरूंग

रत्नागिरी : शहरातील अतिक्रमणांची समस्या संपवण्यासाठी जिल्हा प्रशासन, पालिका व सुरक्षा समिती यांच्या संयुक्त प्रयत्नांतून अतिक्रमण हटाव मोहीम येत्या आठवडाभरात सुरू होणार आहे. मात्र, अतिक्रमण करणाऱ्या संबंधितांनी राजकीय नेत्यांच्या आडून या मोहिमेला सुरूंग लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजप - शिवसेनेत यावरून कलगी-तुरा रंगणार असून, सेनेचे आमदार राजन साळवीही आता आखाड्यात उतरले आहेत. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेवर झालेल्या राजकीय अतिक्रमाणाचा गतिरोधक ओलांडूनच यंत्रणेला कारवाई करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रत्नागिरी शहरातील अतिक्रमणाची समस्या आज-कालची नाही. गेल्या पंधरा वर्षांपासून ही समस्या रत्नागिरीत आहे. अतिक्रमणांचे प्रमाण वाढतच आहे. आता रत्नागिरी शहर स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत असल्याने व त्याबाबतचे निकष पूर्ण करणे आवश्यक असल्याने अतिक्रमणांची सफाई प्रथम करावी लागणार आहे. त्यासाठीच जिल्हा प्रशासनानेही पालिकेला सहकार्य देण्याची तयारी दर्शवित या मोहिमेत सहभाग घेतला आहे.
ही मोहीम केवळ पालिकेनेच राबवण्याचा प्रयत्न यापूर्वी अनेकदा झाला होता. काही अतिक्रमणे हटवण्यातही आली होती. परंतु राजकीय अभय असलेली अतिक्रमणे हटविणे शक्य झाले नव्हते. मात्र, त्यात राजकीय हस्तक्षेपामुळे यश आले नव्हते. आता स्मार्ट सिटीचे निमित्त आहे व जिल्हा प्रशासनाचा त्यात सहभाग असल्याने पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत.
साळवी स्टॉप येथून शहराची सुरुवात होते. या ठिकाणापासून दांडा फिशरीजपर्यंत ७ ते ८ किलोमीटर्स लांबीच्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी पालिकेने अतिक्रमणांच्या ठिकाणांची यादीही तयार केली आहे. या मार्गावरील रस्त्यालगत असलेल्या पालिकेच्या जागेत जी अतिक्रमणे आहेत ती हटवली जाणार आहेत. त्यामध्ये फिरत्या विक्रीचे परवाने दिलेल्या परंतु एकाच जागी राहून विक्री करणारे हातगाडीवरून खाद्य, वस्तू विक्री करणारे सुमारे ८० पेक्षा अधिक विक्रेते आहेत. त्यांनी केलेली अतिक्रमणे या मोहिमेत हटवली जाणार आहेत. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारे रस्त्याच्या लगत अतिक्रमणे केल्याचे पालिकेला आढळून आले आहे. धार्मिक स्थळांच्या शेजारी रस्त्याची, पालिकेची जागा वापरली गेली आहे. काही व्यावसायिकांनीही त्यांच्या दुकानांची छपरे गटारांच्या पुढे वाढविली आहेत. गटारांवर बांधकामेही करण्यात आली आहेत. याशिवाय ज्यांनी रस्त्यालगत असलेल्या पालिकेच्या जागेवर अतिक्रमण केले आहे, त्यांनाही हटविले जाणार आहे. त्यामुळे अतिक्रमणाच्या विषयांवरून रत्नागिरीतील राजकीय वातावरण पेटले आहे. हातगाडीवाल्यांना रस्त्यावर अडचण येणार नाही, अशा जागा वापरासाठी दिल्या जाव्यात, अशी मागणीही होत आहे.
शहरातील मुख्य रस्त्याबरोबरच शहराच्या अंतर्गत भागातील रस्त्यांवरही अनेक अतिक्रमणे आहेत. मिरकरवाडा, उद्यमनगर, कोकणनगर या भागात अतिक्रमणांची संख्या मोठी आहे. मात्र ही अतिक्रमणे हटवण्याबाबत राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असल्याचे चित्र आहे. राबवण्यात येणाऱ्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीम कितपत यशस्वी ठरणार, याबाबत आता नागरिकांना उत्सुकता लागून राहिली आहे. (प्रतिनिधी)


 

Web Title: Dynasty of political encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.