फणसोपमध्ये विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू
By Admin | Updated: November 16, 2014 23:47 IST2014-11-16T22:21:37+5:302014-11-16T23:47:48+5:30
तपासणीनंतर या बिबट्याचे दहन करण्यात आले

फणसोपमध्ये विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू
रत्नागिरी : तालुक्यातील फणसोपच्या लक्ष्मीकेशवनगर येथे बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याचे आज (रविवार) सकाळी उघडकीस आले. हा बिबट्या धनंजय खेडेकर यांच्या राहत्या घराजवळील विहिरीत दोन दिवसांपूर्वीच पडला होता, असे बिबट्याच्या उत्तरीय तपासणीत स्पष्ट झाले. तपासणीनंतर या बिबट्याचे दहन करण्यात आले. फणसोप येथील धनंजय खेडेकर यांच्या घराजवळील या विहिरीत पाण्याचा पंप लावण्यात आला आहे. त्यामुळे पंपाने पाणी घरात घेतले जाते. शनिवारी पंपाने पाणी खेचले जात नाही, असे लक्षात आले. त्यानंतर तपासणी केली असता विहिरीतील फूटव्हॉल्व्हचा पाईप चावलेल्या स्थितीत आढळून आला.
हा पाईपही बदलण्यात आला. मात्र विहिरीत बिबट्या पडल्याची खेडेकर कुटुंबीयांना काहीच माहिती नव्हती.
आज, रविवारी सकाळी ८.३० वाजता खेडेकर हे विहिरीतील पाईपची स्थिती पाहण्यास गेले असता घाण वास आला. त्यावेळी पाण्यावर काहीतरी तरंगत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर खात्री केली असता तो बिबट्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलीस व वनखात्याला याबाबत माहिती दिली. बिबट्याचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. त्याचठिकाणी त्याची उत्तरीय तपासणी केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)