आचरा : ४२ दिवसांच्या गणरायाला निरोप
By Admin | Updated: October 9, 2014 23:06 IST2014-10-09T21:52:50+5:302014-10-09T23:06:00+5:30
श्री देव रामेश्वर संस्थानच्या सार्वजनिक गणेशोत्सवातील गणेशमूर्तीचे विसर्जन

आचरा : ४२ दिवसांच्या गणरायाला निरोप
आचरा : आचरा दशक्रोशीतील ४२ दिवस वातावरण गणेशमय करून टाकणाऱ्या इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या सार्वजनिक गणेशोत्सवातील गणेशमूर्तीचे विसर्जन गुरूवारी सायंकाळी ‘मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात आचरा पिरावाडी येथील समुद्रकिनारी झाले. इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या सार्वजनिक गणेशोत्सवातील श्री गणेशमूर्तीचे विसर्जन मिरवणुकीवेळी ढोलताशांचा गजर व फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व मुंबई, ठाणे, गोवा, कोल्हापूर येथील हजारो भक्तांची उपस्थिती होती. सर्वात जास्त दिवस साजरा करण्यात येणारा आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या सार्वजनिक गणेशोत्सवात विविध सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरूवारी दुपारी १२ वाजता श्रींच्या मूर्तीचे विधीवत उत्तरपूजन झाल्यानंतर १ वाजता श्रींच्या मूर्तीची कांदिवली (मुंबई) येथील ढोलपथकाच्या साथीने वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. रामेश्वर मंदिराकडून या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाल्यानंतर आचरा तिठा, बाजारपेठमार्गे, भंडारवाडी, काझीवाडा, गाऊडवाडी, आचरा बंदरमार्गे श्री देव चव्हाटा येथून पिरावाडी येथील समुद्रकिनारी मिरवणूक विसर्जित करण्यात आली. श्री चव्हाटा येथून या गणेशमूर्तीची व्यवस्था पिरावाडीतील मच्छिमार बांधवांकडून करण्यात आली होती. यावेळी गणेशभक्तांना यशराज संघटनेच्यावतीने प्रसाद व पाणी तसेच बालगोपाळ मंडळ वरचीवाडीतर्फे मोदक वाटप करण्यात आले. या मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह बंदोबस्त ठेवला होता. या मिरवणुकीत ख्रिश्चन, मुस्लिम बांधवही सहभागी झाले होते. या मिरवणुकीने हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा संदेश दिला. (वार्ताहर)