कर वाढीवरून खडाजंगी
By Admin | Updated: December 2, 2014 00:30 IST2014-12-01T21:48:42+5:302014-12-02T00:30:26+5:30
कणकवली नगरपंचायत सभा : विरोधी नगरसेवक आक्रमक

कर वाढीवरून खडाजंगी
कणकवली : शहरातील मालमत्ता कराचे दर तसेच करयोग्य मूल्यदर वाढविण्याच्या मुद्यावरून नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा गाजली. काहीकाळ या मुद्यावरून सत्ताधारी तसेच विरोधी नगरसेवकांमध्ये खडाजंगीही झाली. मात्र जनतेला विश्वासात घेऊनच याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे नगराध्यक्षा अॅड. प्रज्ञा खोत यांनी जाहीर केल्यानंतर विरोधी नगरसेवक शांत झाले.
नगरपंचायतीच्या प.पू. भालचंद्र महाराज सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन सोमवारी नगराध्यक्षा अॅड. प्रज्ञा खोत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होेते. यावेळी उपनगराध्यक्ष समीर नलावडे उपस्थित होते. सर्वसाधारण सभेला मुख्याधिकारी उपस्थित राहिलेच पाहिजेत, अशी मागणी उपनगराध्यक्षांसह काही नगरसेवकांनी केली. कायमस्वरूपी मुख्याधिकारी कार्यरत नसल्याने तूर्तास नायब तहसीलदार संतोष खरात यांच्याजवळ पदभार देण्यात आला आहे. महसूल विभागाच्या बैठकीसाठी ते गेल्याने नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेला ते अनुपस्थित असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. कणकवली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर शहरातील घरपट्टी वाढविण्यात आलेली नाही. महाराष्ट्र नगरपालिका एकत्रित मालमत्ता कर नियम १९६९ मधील नियम ३ नुसार मालमत्ता कराचे दर तसेच करयोग्य मूल्यदर वाढविणे आवश्यक असल्याचे नगराध्यक्षांनी सभागृहात सांगितले.
याबाबतचे धोरण निश्चितीकरण्यासाठी ठराव घेण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी केली. मात्र घरपट्टीसह अन्य कराच्या वाढीबाबत नेमकी स्थिती जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत विरोधी नगरसेवकांचा विरोध राहणार असल्याचे नगरसेवक सुशांत नाईक यांनी सांगितले. या मुद्यावरून सत्ताधारी तसेच विरोधकांमध्ये खडाजंगी उडाली. शहरातील नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतील तर कर वाढविणे क्रमप्राप्त आहे. मात्र त्याबाबतचा निर्णय नागरिकांना विश्वासात घेऊनच घेतला जाईल, असे नगराध्यक्षा अॅड. खोत यांनी यावेळी सांगितले. नगरसेवक बंडु हर्णे यांनी करयोग्य मूल्यदर ठरविण्याबाबतच्या प्रक्रियेबाबत सभागृहाला माहिती दिली. तसेच करवाढीसाठी नगरसेवकांनी विरोध केल्यास त्यांचे पद धोक्यात येऊ शकते, असा टोला सुशांत नाईक यांना लगावला. तर जनतेसाठी पद धोक्यात आले तरी चालेल मात्र जनतेला त्रास होईल, असा निर्णय घेण्यास आमचा विरोधच राहील, असे नाईक यांनी स्पष्ट केले.
करवाढीबाबत निर्णय घेण्यासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या समितीत पत्रकार, डॉक्टर, वकील तसेच शहरातील संस्थांच्या प्रतिनिधींनाही सहभागी करून घेण्यात यावे, अशी सूचना कन्हैय्या पारकर यांनी मांडली. तर घरपट्टी वाढल्यास सामान्य जनतेला ती टप्प्याटप्प्याने भरण्याची सवलत देण्यात यावी, असे बंडु हर्णे यांनी सांगितले. जुन्या घराच्या ठिकाणी बांधलेल्या बंगल्याचा असेसमेंट अजूनही नगरसेवक सुशांत नाईक यांनी केलेला नाही, असा आरोप उपनगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केला. तर नगरपंचायतीमध्ये अर्ज करूनही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याचे सुशांत नाईक यांनी सांगितले.
तेरावा वित्त आयोग, महाराष्ट्र राज्य सुजल निर्माण अभियान, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मिळणारा निधी, सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अशा विविध योजनांमधून मिळणाऱ्या निधीतून विकासकामे करण्याबाबत चर्चा करण्यात आली. पर्यटन सुविधा केंद्राच्या इमारतीचे नुतनीकरण करणे तसेच मुडेश्वर मैदानासाठी जागेचे भूसंपादन करणे याबाबतही चर्चा करण्यात आली. सफाई कर्मचारी रमेश जाधव व मनोहर कांबळे यांना सेवानिवृत्ती वेतन लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
वाहन चालक सदानंद ताम्हाणेकर व व्हॉलमन उमेश परब यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याबाबत कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून न्यायालयीन लढा देण्यात यावा, असेही यावेळी सुचविण्यात आले. शहरातील मिनी गार्डनमध्ये तत्काळ खेळणी बसविण्यात यावीत. यासाठी नगरपंचायत फंडातून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी बांधकाम सभापती अभिजीत मुसळे यांनी यावेळी केली.
तर कनकनगर येथील गणपती सान्याच्या कामासाठी तत्कालिन आमदार विनायक राऊत यांनी देऊ केलेला निधी निविदा प्रक्रिया झाल्याचे सांगून नाकारण्यात आला. मात्र अद्यापि ते काम पूर्ण न झाल्याबाबत सुशांत नाईक यांनी नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)
बिल्डरचा अल्प प्रतिसाद
कणकवली रेल्वे स्थानक परिसरातून जाणाऱ्या ड्रेनेज सिस्टीमसाठी रेल्वे प्रशासनाला नगरपंचायतीकडून काही रक्कम देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र या परिसरातील काही बिल्डरनीच नगरपंचायतीकडे या कामासाठी रक्कम अदा केली असून इतर बिल्डरचा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती सभागृहात देण्यात आली.
बहुउद्देशीय सभागृहासाठी शुल्क आकारणार
नगरपंचायतीच्या बहुउद्देशीय सभागृहात येणाऱ्या खेळाडूंकडून यापुढे फी आकारण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. तर लहान मुलांना फीमध्ये सवलत देण्याचेही निश्चित करण्यात आले.
गुरांसाठी कोंडवाडा उभारणार
मोकाट गुरांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असून वागदे येथील गोपुरी आश्रमाच्यावतीने कोंडवाडा करण्यासंदर्भात नगरपंचायतीला पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्याबाबत संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले.