कडक नियमांमुळे वाहन अपघातांचे प्रमाण होणार कमी
By Admin | Updated: January 1, 2015 00:17 IST2014-12-31T22:02:37+5:302015-01-01T00:17:23+5:30
गेल्या पाच वर्षांत मुंबई - गोवा महामार्गासह अन्य राज्य मार्ग व अंतर्गत ग्रामीण मार्गावरही मोठ्या प्रमाणात अपघात

कडक नियमांमुळे वाहन अपघातांचे प्रमाण होणार कमी
रत्नागिरी : वाहतूक नियमांचा भंग करणे वाहनचालकांच्या आता चांगलेच अंगाशी येणार आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात वाहन चालवताना जे चालक अपघाती मृत्यूस कारण ठरले आहेत, त्यांचे वाहन परवाने रद्द करण्यात यावेत, असा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविला जाणार आहे. त्यामुळे वाहन अपघातांची संख्या कमी होणे शक्य आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय पांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. गेल्या पाच वर्षांच्या काळात मुंबई - गोवा महामार्गासह अन्य राज्य मार्ग व अंतर्गत ग्रामीण मार्गावरही मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. यात वाहने बेदरकारपणे चालविणे, मद्य प्राशन करून वाहने चालविणे तसेच अन्य वाहतूक नियम पायदळी तुडवून वाहने हाकणे, यामुळे घडलेल्या अपघातात शेकडो लोकांचा बळी गेला आहे. या अपघातांचा आढावा घेतल्यानंतर त्याची गंभीर दखल जिल्हा पोलिसांनी घेतली आहे.
या संपूर्ण अपघातांच्या प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर वाहतूक नियमांचे सातत्याने उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुळावरच घाव घातल्याशिवाय समस्येची उकल होणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. गेल्या पाच वर्षांत ज्यांच्या बेपर्वाईमुळे महामार्ग, राज्यमार्गावर अपघात झाले व त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, अशा प्रकरणांची वर्गवारी पोलिसांकडून केली जात आहे. त्यात दोषी असलेल्या वाहनचालकांचे परवाने रद्द केले जाणार आहेत. तसा प्रस्ताव तातडीने उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे जिल्हा पोलिसांकडून पाठवला जाणार आहे.
सन २०१३मध्ये झालेल्या ५८३ रस्ते अपघातात १५३ जणांचा बळी गेला. २०१४ या वर्षात जिल्ह्यात नोव्हेंबरअखेर झालेल्या ७७५ रस्ते अपघातात एकूण १५२ लोकांना प्राण गमवावे लागले. गेल्या पाच वर्षांचा रस्ते अपघातांचा आलेख लक्षात घेता त्यात सातत्याने वाढ होत असून, ही बाब अत्यंत गंभीर आहे. मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण येत्या दोन वर्षाच्या काळात होणार आहे. (प्रतिनिधी)
सध्यस्थितीत वाढलेले अपघात रोखणे अत्यंत आवश्यक बनले आहे. त्यासाठीच जिल्हा पोलिसांनी आता गंभीरपणे पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्याबाबत लवकरच कठोर उपाययोजना अमलात येणार आहे.
- डॉ. संजय शिंदे,
पोलीस अधीक्षक
वाहतूक कोंडी रोखणार
महामार्गावरील वाहतूक कोंडीचे प्रकार कमी करण्यासाठी खेड, दापोली, चिपळूण, रत्नागिरी व राजापूर या शहरांचा मास्टर प्लॅन बनविला जाणार आहे. त्यामुळे या शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येची उकल करणे शक्य होणार आहे. शहरात रस्त्यांची रूंदी कमी असून, वाहनांची संख्या वाढली आहे. वाहनांच्या तुलनेत रस्ते अपुरे पडत आहेत. त्यामुळे आवश्यक उपाययोजना केली जाणार आहे.