पराभव आप्तस्वकियांमुळेच!
By Admin | Updated: July 1, 2014 23:57 IST2014-07-01T23:55:05+5:302014-07-01T23:57:50+5:30
नीतेश राणे : लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे केले विश्लेषण

पराभव आप्तस्वकियांमुळेच!
कणकवली : लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव हा मोदीलाटेमुळे झाला असल्याचे मला मान्य नाही. असे असते तर मालवण नगरपरिषद व आंब्रड जिल्हा परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव दिसून आला असता. अवघ्या सव्वा महिन्यात हा प्रभाव ओसरला नसता. निवडणुकीतील पराभव हा आमच्या काही प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठेकेदारीच्या माध्यमातून केलेल्या गैरकामांबाबत जनतेने व्यक्त केलेला राग होता, असे स्पष्ट मत काँग्रेसचे प्रांतिक सदस्य नीतेश राणे यांनी व्यक्त केले.
कणकवली येथे पत्रकार परिषदेत बोलताना नीतेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसचे अनेक नेते तसेच कार्यकर्ते ठेकेदार बनले आहेत. कामे घ्यायची आणि ती वेळेत पूर्ण करायची नाहीत, अशी त्यांची पद्धत असून त्याबद्दलचा राग जनतेने या निवडणुकीतून व्यक्त केला आहे. नारायण राणे यांनी आतापर्यंत जनतेसाठी केलेल्या प्रचंड कामासमोर मोदीलाट टिकू शकली नसती. मात्र जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांबद्दलचा राग या लोकसभा निवडणुकीच्या निकालातून व्यक्त झाला आहे.
जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये. राणे कुटुंबियांच्या किती जमिनी आहेत हे जाहीर करायला आम्ही तयार आहोत. आमचे नाव सांगून कोणी जनतेच्या जमिनी लाटत असेल तर त्याची यापुढे गय केली जाणार नाही. मग तो कितीही जवळचा किंवा कानात बोलणारा नेता असला तरीही त्याची गय केली जाणार नाही.
मालवण तसेच आंब्रड पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे मी अभिनंदन करतो. येणाऱ्या विधानसभेत कुडाळ-मालवण मतदारसंघातून स्वत: नारायण राणे निवडणूक लढविणार नसतील तर वेगळ््या लोकांना संधी द्यावी. जनतेला राणे पसंत नसतील व तेली, सावंत, कुडाळकर, पडते पसंत असतील तर त्यांच्या विजयासाठी आम्ही काम करू.
पक्षात नाराज असलेल्यांचे नेतृत्व करणारे नेते आहेत. ते नाराज झालेले आणखीन कसे नाराज होतील, यासाठी प्रयत्न करीत असतात आणि त्याचाच फायदा विरोधकांना होत आहे. राजकारणात कधीच कोणी कोणाचा शत्रू नसतो. विरोधक असू शकतो, हे विरोधकांनी लक्षात घ्यायला हवे. नव्या पिढीतील मतदारांपर्यंत लोकसभा निवडणुकीत आम्ही पोहोचू शकलो नसल्यास यापुढे तसे प्रयत्न करण्यात येतील, असेही राणे यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)