कणकवली तालुक्यात दोघांचा तापाने मृत्यू
By Admin | Updated: September 27, 2015 00:19 IST2015-09-27T00:19:32+5:302015-09-27T00:19:45+5:30
तापसरीच्या रूग्णांमध्ये वाढ : आरोग्य विभागासमोर आव्हान

कणकवली तालुक्यात दोघांचा तापाने मृत्यू
नांदगांव : कणकवली तालुक्यातील नांदगांव मधलीवाडी येथील विजय वसंत पाटील यांचे डेंग्यूच्या तापाने उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री ९.३० वाजता कणकवली येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. तर फोंडाघाट रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष मोहन विष्णू गोसावी (वय ५८) यांचा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी दुपारी १२ वाजता मृत्यू झाला.
गेले चार दिवस मोहन गोसावी यांना ताप येत होता. खासगी डॉक्टरची ते औषधे घेत होते. अत्यवस्थ वाटू लागल्याने त्यांना शनिवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. फुफ्फुसे निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (गृह मंत्रालय) दलात रँक एचसीआयजीडी हेड कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत असलेले पाटील हे गणेशोत्सवासाठी आपल्या नांदगाव या गावी आले होते. त्यांच्या निधनाने पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नांदगांव मधलीवाडी येथे मूळ गाव असलेले विजय पाटील हे १८ सप्टेंबरला गावी आले. नोकरीनिमित्त ते उत्तर प्रदेशात कार्यरत होते. १५ सप्टेंबरला ते मुंबईला डोंबिवली येथील घरी आले आणि तिथून ते गणेशोत्सवासाठी गावी आले. गावी आल्यानंतर त्यांचे अंग दुखत होते. नेहमी सर्वांमध्ये मिसळणारे असूनही गणपतीत ते भजनाला गेले नाहीत. त्यानंतर नांदगांव येथील खासगी रुग्णालयात गेले. तेथे बरे वाटल्याने भजनाला जावू लागले. याच दरम्यान त्यांना तब्येतीत थोडे अत्यवस्थ वाटू लागले. यानंतर ते पुन्हा खासगी रुग्णालयात गेले.
मात्र, तब्येतीत कोणतीही सुधारणा नसल्याने ते २३ सप्टेंबरला सायंकाळी ४ वाजता थोडा त्रास होऊ लागल्याने नांदगांव प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी गेले. त्यावेळी प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांना कणकवली येथे उपचारासाठी जाण्यास सांगितले. त्यावेळी पाटील यांना खोकला आणि धाप जास्त लागत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. तिथून त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. त्यावेळी झालेल्या चाचणीत कोणताही निष्कर्ष आला नाही. मात्र २४ सप्टेंबरला सायंकाळी ६.३० वाजता डेंग्यूचा ताप असल्याचे निदान केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले.
मात्र तब्येतीत सुधारणा होत नव्हती. २५ सप्टेंबरला दुपारी २.३० वाजता आयसीयूमध्ये दाखल केले. त्यानंतर ४.३० वाजता व्हेंटीलेटरवर ठेवले व तब्येत खालावल्यामुळे पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. यावेळी पुन्हा एकदा उपचारासाठी कणकवली येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. यावेळी डॉक्टरांच्या निरीक्षणानंतर तातडीने उपचार सुरु करण्यात आले. मात्र अधिक प्रकृती खालावल्यामुळे अखेर २५ सप्टेंबरला रात्री ९.३० वाजता उपचारादरम्यान पाटील यांचे निधन झाले. पाटील यांनी गेली १९ वर्षे देशसेवा केली. आपल्या कुटुंबासोबत त्यांनी देशसेवेचे व्रत स्वीकारल्याने कुटुंबाबरोबर ते जास्त राहू शकले नाहीत. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या पाटील यांच्या निधनाने पाटील कुटुंबासह नांदगांव गावावर शोककळा पसरली आहे. पाटील यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, वडील, तीन मुली असा परिवार आहे. शनिवारी दुपारी नांदगांव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)