दापोलीत किनाऱ्यावर केमिकलचे बॅरल आढळल्याने खळबळ
By Admin | Updated: August 4, 2015 00:08 IST2015-08-03T23:32:05+5:302015-08-04T00:08:28+5:30
पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश

दापोलीत किनाऱ्यावर केमिकलचे बॅरल आढळल्याने खळबळ
दापोली : तालुक्यातील बुरोंडी, मुरुड, पाळंदे, हर्णे येथील समुद्रकिनाऱ्यावर रसायन भरलेले १३ बॅरल संशयास्पद स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली असून, प्रयोगशाळेतील तपासणीनंतरच या बॅरेलमधील रसायनाचा शोध लागणार
आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी पोलिसांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.काही बॅरेल रविवारी समुद्रकिनारी आढळले होते. मात्र त्यामध्ये पेट्रोल अथवा डिझेल असावे, असे समजून मच्छिमारांनी ते आपल्या घरी नेले. मात्र त्यानंतर सोमवारी हर्णे, पाळंदे, मुरुड, बुरोंडी आदी ठिकाणी १३ संशयास्पद बॅरेल आढळून आले. त्यामुळे मच्छिमारांमध्येही खळबळ उडाली आहे. काही बॅरेल समुद्रात तरंगत असल्याचे दिसून आल्याने पोलीस हे बॅरेल किनारी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.या बॅरेलमध्ये कोणते रसायन आहे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ते ताब्यात घेऊन फॉरेन्सिक लॅबला पाठविले आहेत. या लॅबच्या तपासणी अहवालानंतरच रसायनचा शोध लागणार आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी पोलिसांना सतर्क तेचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)