सुक्या मेव्याचे दर तीस टक्क्यांनी वाढले...
By Admin | Updated: July 22, 2014 23:35 IST2014-07-22T23:03:29+5:302014-07-22T23:35:02+5:30
रमजान ईद : ‘किक, रामलीला, देवयानी’ची कपड्यांवर छाप, यंदाच्या सणाला महागाईचे चटके

सुक्या मेव्याचे दर तीस टक्क्यांनी वाढले...
सांगली : आठ दिवसांवर आलेल्या रमजान ईदच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. मात्र यंदाची ईद मुस्लिम बांधवांना महागडी ठरणार आहे. सुक्यामेव्याचे दर यंदा तब्बल २५ ते ३० टक्क्यांनी, तर कपड्यांचे दर दहा टक्क्यांनी वाढले आहेत. ‘किक, रामली’ला या चित्रपटांबरोबरच ‘देवयानी, पुढचं पाऊल (आक्कासाहेब) या मालिकांमधील कपड्यांची, साड्यांची छाप यंदाच्या ईदला दिसून येत आहे.
ईदच्या पार्श्वभूमीवर बाजारात गुंजन, शहनाज, दुल्हन, देवयानी, आक्कासाहेब आदी साड्या आल्या असून, त्यांना चांगली मागणी असल्याची माहिती साडी दुकानदार मुकुंद सारडा यांनी दिली. या साड्यांच्या किमती पाचशे रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत आहेत. दीड हजाराच्या साड्यांना मागणी आहे.
लहान मुलांसाठी वेस्कोट, लॉग कली चुडीदार, फॅन्सी शर्ट, थ्री फोर्थ आदी ड्रेस आले आहेत. ‘किक’ ‘रामलीला’ व गतवर्षीचा ‘राऊडी राठोड’ या चित्रपटांची छाप लहान मुलांच्या कपड्यांवर दिसून येत आहे. या ड्रेसच्या किमती पाचशे ते दोन हजार रुपयांच्यादरम्यान आहेत. पंधरा वर्षांच्या मुलींसाठी रामलीला घागरा सातशे ते दीड हजार रुपयांपर्यंत आहे. गेल्या चार दिवसांपासून ईदच्या खरेदीला गर्दी वाढत असल्याची माहिती कपडे विक्रेते जगदीश सारडा यांनी दिली. तरुणांसाठी विविध प्रकारच्या जीन्स, टी शर्ट बाजारात आले आहेत.
यंदा सुक्यामेव्याच्या खरेदीमध्ये मुुस्लिम बांधवांना सर्वाधिक फटका बसत आहे. उत्पादन घटल्याने पिस्ता, अक्रोडचे दर तब्बल तीस टक्क्यांनी महागले आहेत, तर काजू, बदामचे दर दहा ते पंधरा टक्क्यांनी महागले असल्याची माहिती सुका मेवा विक्रेते मेघजीपालन हरीया यांनी दिली. (प्रतिनिधी)