चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत
By Admin | Updated: January 2, 2015 22:02 IST2015-01-02T22:02:36+5:302015-01-02T22:02:51+5:30
रतनसिंग रजपूत : वेंगुर्ले आगारात ‘सुरक्षितता मोहिमे’चा शुभारंभ

चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत
वेंगुर्ले : प्रत्येक वाहनाच्या चालकाने वाहतूक नियमांचे पालन करून वाहने चालविल्यास अपघात होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. मोठ्या वाहनाने लहान वाहनास सांभाळले पाहिजे, असा नियम असल्याने मोठ्या गाडीची अपघातात चूक नसली, तरीही मोठ्या वाहनाच्या चालकास दोषी ठरविले जाते. सर्रासपणे ९० टक्के अपघात चालकाच्या चुकांमुळे घडतात. तर १० टक्के अपघात यांत्रिक बिघाड व तत्सम कारणाने घडतात. आपली हक्काची, नियोजित वेळेत सुटणारी व सुरक्षित प्रवास देणारी अशी प्रतिमा असलेल्या
एसटीच्या चालकांनी वाहतुकीचे नियम पाळून प्रवाशी वर्गास सेवा द्या, असे प्रतिपादन वेंगुर्ले पोलीस निरीक्षक रतनसिंग रजपूत यांनी वेंगुर्ले आगार सुरक्षितता मोहीम उद्घाटनप्रसंगी केले.
एसटी महामंडळाच्या वेंगुर्ले आगारात १ ते १० जानेवारी सुरक्षितता मोहिमेचा शुभारंभ काल, गुरुवारी पोलीस निरीक्षक रजपूत यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी वेंगुर्ले आगार व्यवस्थापक अजय बनारसे, वाहतूक निरीक्षक गौतमी कुबडे, वरिष्ठ लिपिक एन. ए. पवार, सहायक कार्यशाळा अधीक्षक एस. के. मुणगेकर, कार्यशाळा अधिकारी जया गोरे, आदी उपस्थित होते.
वेंगुर्ले आगाराचा २५ वा वर्धापन दिन व राज्य परिवहन महामंडळाची सुरक्षितता मोहीम ( दि.१ ते १० जानेवारी) या कार्यक्रमाचा शुभारंभ एकाचवेळी झाला. व्यासपीठावरील मान्यवरांनी या कार्यक्रमात आगार शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रवासास गाड्या सुयोग्य करून देण्याचे, तर चालकांना गाड्या वाहतूक नियमांचे पालन करून चालिवण्याचे आवाहन करण्यात आले.
गाड्यांच्या अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वळण, रस्त्यांची दुर्दशा, साईडपट्ट्यांवरील झाडी, घरातील तणाव असलेले चालक, वाहतूक नियमांचे पालन न करणे, पादचारी वर्गाचा चुकीच्या पद्धतीने प्रवास, वाहतुकीस सुयोग्य नसलेले वाहन या गोष्टी असून ‘जीव मोलाचा प्रवास सुरक्षेचा’ या उक्तीप्रमाणे प्रत्येक चालकाबरोबरच पादचारी, प्रवाशांनीही त्यास सहकार्य करावे, सार्वजनिक बांधकाम खात्यानेही वळणावरील झाडी, झुडपे व साईडपटनट्या, पादचारी यांच्यासाठी साफसफाई केल्यास वाहनांच्या अपघातांना निश्चितच आळा बसेल. एसटी चालकांनी प्रवासात सुयोग्य अशी बसल्याची खात्री करून घ्या, डोक्यात कोणत्याही विचारांना थारा देऊ न देता प्रवासी सेवा द्या, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार जया गोरे यांनी मानले. यावेळी आगारातील कार्यशाळा कर्मचारी व चालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)