मच्छिमार मागण्यांवर तोडगा काढा : तांडेल
By Admin | Updated: July 28, 2014 23:21 IST2014-07-28T22:23:51+5:302014-07-28T23:21:20+5:30
पुनर्विकासाला मंजुरी नाही

मच्छिमार मागण्यांवर तोडगा काढा : तांडेल
चिपळूण : कोळीवाडे व मच्छिमार वसाहती यांच्या विकासाच्या प्रलंबित प्रस्तावांवर निर्णय घेण्यासाठी केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनासोबत संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी महाराष्ट्र मच्छिमार विकास संघटनेचे अध्यक्ष महेश तांडेल यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे. मुंबईतील भूमिपुत्र कोळी समाजाचे, कोळीवाड्याचा विकास, मच्छिमार वसाहतीचा विकास यांचे प्रलंबित प्रस्ताव राज्य शासनाकडे केंद्र शासनाचा सीआरझेड कायदा आड येत असल्यामुळे प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे कोळीवाडा मच्छिमार वसाहतीच्या पुनर्विकासाला मंजुरी मिळत नाही. पर्यायाने कोळीवाड्याचा व मच्छीमार वसाहतीचा विकास खुंटला आहे.
तसेच मच्छिमार वसाहतीच्या भुखंडावर महाराष्ट्र शासनाने उद्यान, वाहनतळ अशी आरक्षणे टाकलेली आहेत. त्यामुळे मच्छिमार वस्त्यांचा विकास होणे फार मोठे अडचणीचे झाले आहे. ह्या भूमिपुत्रांचा विकास होण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन ह्या बैठकीसाठी महाराष्ट्र शासनातर्फे मुख्य सचिव, नगरविकास विभाग प्रधान सचिव, गृहनिर्माण प्रधान सचिव, महसूल व वन विभाग प्रधान सचिव, पर्यावरण प्रधान सचिव या उच्चस्तरीय अधिकारी व मच्छिमार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक बोलावून निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. जावडेकर यावेळी कोणता निर्णय घेतात इकडे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)