‘डबलडेकर’ सामान्यांच्या आवाक्याबाहेरची!

By Admin | Updated: August 17, 2014 00:21 IST2014-08-17T00:19:19+5:302014-08-17T00:21:26+5:30

तिकीट दर विमान सेवेसारखे : उशिरा होणाऱ्या आरक्षणाला दर वाढणार

Doubleday 'beyond the reach of the people! | ‘डबलडेकर’ सामान्यांच्या आवाक्याबाहेरची!

‘डबलडेकर’ सामान्यांच्या आवाक्याबाहेरची!

विहार तेंडुलकर ल्ल रत्नागिरी
गणेशोत्सवात कोकण रेल्वेमार्गावर दिमाखात ‘एन्ट्री’ करणाऱ्या डबलडेकर रेल्वेचा प्रवास खर्चही तेवढाच ‘वजनदार’ आहे. त्यामुळे गणेशोत्सवात कोकण रेल्वे आरक्षणासाठी तीन महिन्यांपासून नियोजन करणाऱ्या प्रवाशांनी
या महागड्या प्रवासाकडे पाठ फिरविली आहे.
विमान सेवेप्रमाणे हा प्रवास आरक्षणाच्या विलंबानुसार महागडा होत असल्याने तिकिटाचे दर सामान्य प्रवाशांच्या खिशाला पेलवणारे नसल्याचे मत व्यक्त होत आहे. त्यामुळे या रेल्वेला अत्यल्प प्रतिसाद मिळत असून, शुक्रवार (दि. २२)ची मुंबई ते रत्नागिरी दरम्यानची आतापर्यंत केवळ १२ तिकिटे विकली गेली आहेत.
कोकण रेल्वेमार्गावर डबलडेकर रेल्वेची चाचणी झाल्यानंतर गणेशोत्सवात पहिल्यांदाच ही रेल्वे प्रवाशांना घेऊन धावणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वे प्रवाशांनी आनंद साजरा केला असला तरी इंटरनेटवर आरक्षण करण्यास गेल्यानंतर दर पाहून प्रवाशांची ‘मती’ गुंग झाली आहे.
डबलडेकर रेल्वे ही पूर्णपणे वातानुकूलित आहे. त्यामुळे या गाडीचे आरक्षण करताना विमान सेवेप्रमाणेच खिशाला चाट बसणार आहे. आरक्षण जेवढे उशिराने केले जाईल, तेवढे ते महागणार आहे. या सुपर व वातानुकूलित गाडीसाठी असलेला प्रीमिअम चार्ज हा प्रवाशांच्या संख्येनुसार कमी-जास्त होत राहणार आहे. त्यामुळे आरक्षण करताना त्या गाडीसाठी किती प्रवाशांनी आरक्षण केले आहे, त्यावरून हा आकार बदलत राहणार आहे. ही डब्बलडेकर गाडी मुंबई-रत्नागिरी-करमाळी असा प्रवास करणार आहे.
वातानुकूलित डबलडेकरचा प्रवास हा रेल्वेच्या साध्या प्रवासाच्या तिप्पट महाग पडणार आहे. त्यामुळे या रेल्वेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. २२ तारखेला जी रेल्वे मुंबईहून रत्नागिरीत येणार आहे त्या रेल्वेसाठी आतापर्यंत केवळ १२ प्रवाशांनीच आरक्षण केले आहे.
मुंबई-रत्नागिरीसाठी तसेच रत्नागिरी-करमाळी यासाठी प्रत्येकी ३२ आसनांचा आरक्षण कोटा आहे. त्यापैकी केवळ १२ तिकिटे आतापर्यंत विकली गेली आहेत, तर रत्नागिरी-करमाळी केवळ तीनच सीटस्चे आरक्षण झाले आहे.
रत्नागिरी-करमाळी हा प्रवास शनिवारच्या दरानुसार ७१० रुपये एवढा आहे, तर मुंबई ते
रत्नागिरी हा प्रवास ७०० रुपये आहे. तसेच मुंबई ते गोवा असे तिकीट काढल्यास ते १३५० रुपयांना पडणार आहे.
आज काढलेल्या तिकीट दराचे विश्लेषण
मुंबई - रत्नागिरी.... तिकीट ७०० रुपये
आरक्षण रक्कम - ४०
सुपर गाडीचा चार्ज - ४५
जेवण - ८५
सेवा कर - १७
प्रीमियम चार्ज - १२५ (प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्यास हा आकार वाढवला जातो)
तिकीट दर - ३८८
मुंबई - गोवा : एकूण तिकीट १३५० रुपये
आरक्षण रक्कम - ४०
सुपर गाडीचा चार्ज - ८५
जेवण - २००
सेवा कर - १७
प्रीमियम चार्ज - १५० (प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्यास हा आकार वाढवला जातो)
तिकीट दर - ८५८
मी शनिवारी डबलडेकरने रत्नागिरी-करमाळी असा प्रवास करण्यासाठी तीन जागांचे आरक्षण केले. शनिवारच्या दरानुसार हे तिकीट प्रत्येक सीटमागे ५९५ रुपये एवढे पडले. त्यामुळे डबलडेकर सामान्यांसाठी नाहीच असे वाटते. आरक्षण जेवढे उशिराने केले जाईल तेवढे हे तिकीट वाढते. कारण या तिकिटांचा मूळ आकार हा ५९५ रुपये आहे, तर उर्वरित रक्कम ही प्रीमियम चार्ज म्हणून आकारला जात आहे. जर सीटस् कमी असल्या तर हा प्रीमियम चार्ज वाढविला जातो, त्यामुळे आरक्षण महागते.
-प्रा. उदय बोडस, रत्नागिरी

Web Title: Doubleday 'beyond the reach of the people!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.