कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करा

By Admin | Updated: September 22, 2014 01:00 IST2014-09-22T00:56:41+5:302014-09-22T01:00:53+5:30

मोहन केळूसकर : महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा

Double the Konkan Railway route | कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करा

कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करा

कणकवली : कोकण रेल्वेचे अध्यक्ष भानुप्रसाद तायल यांच्या नियोजनशून्य गैरकारभारामुळे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. तरीही दक्षिणेकडील राज्यांच्या मागणीनुसार या मार्गावर अजूनही काही नवीन गाड्या सुरू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कोकणवासियांच्या त्यागातून हा मार्ग अस्तित्वात आला आहे. त्यामुळे प्रथम कोकणवासियांना प्राधान्य द्या. या मार्गावर क्षमतेच्या बाहेर गाड्या चालवायच्या असतील तर या मार्गाचे तातडीने दुपदरीकरण करा, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळूसकर यांनी महामंडळाचे संपर्क अधिकारी करंदीकर यांच्याकडे केली आहे.
कोकण रेल्वेच्या प्रवाशांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी कोकण रेल्वे महामंडळाच्या बेलापूर येथील कार्यालयावर मोर्चा नेण्याचे कोकण विकास आघाडीने जाहीर केले होते. मात्र आचारसंहितेमुळे हा मोर्चा स्थगित झाला. मात्र, आघाडीने मोहन केळूसकर यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी करंदीकर यांच्याशी बेलापूर येथील सीबीडी पोलीस ठाण्यामध्ये
चर्चा केली. यावेळी केळूसकर बोलत होते.
प्रशासनाने मोर्चाला स्थगिती दिली. मात्र, आघाडीच्या कार्यकर्त्यांनी याप्रश्नी तडक बेलापूर गाठले. त्यावेळी सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कारेकर यांनी आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यामध्ये पाचारण केले. तसेच महामंडळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. त्यानंतर पोलीस ठाण्यामध्येच एका कक्षामध्ये कोकण रेल्वेप्रश्नी चर्चा झाली.
ते म्हणाले, कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या प्रशासनामध्ये सामंजस्य नसल्याने कोकणवासिय प्रवासी भरडला गेलाच, पण मुंबईकडे परतताना या प्रवाशांनी कोकण रेल्वेची एवढी धास्ती घेतली की त्याने एसटी आणि खासगी गाड्यांतून प्रवासाला प्राधान्य दिले. परिणामी रेल्वेला नुकसान झाले. एकीकडे काही नियमित गाड्या रद्द केल्या. मात्र हंगामी गाड्या चालू होत्या. नियमित गाड्यांतील आरक्षित प्रवाशांची सोय या रिकाम्या धावणाऱ्या गाड्यांतून केली असती तर प्रवाशांना मनस्ताप झाला नसता.
या चर्चेमध्ये कोकण विकास आघाडीचे सरचिटणीस सूर्यकांत पावसकर, उपाध्यक्ष भाऊ परब, रमाकांत जाधव, भाई चव्हाण, काका जाधव, नरेंद्र म्हात्रे, भालचंद्र तारी, चंद्रकांत फटकरे, नागेश घाडीगावकर आदी सहभागी झाले
होते. (प्रतिनिधी)

Web Title: Double the Konkan Railway route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.