नाताळनंतर डबल डेकर धावणार स्वस्तात ?

By Admin | Updated: September 12, 2014 23:30 IST2014-09-12T23:27:59+5:302014-09-12T23:30:34+5:30

अत्यल्प प्रतिसादामुळे रेल्वे जमिनीवर : मध्य रेल्वेला हीच गाडी हवी आहे पुणे किंवा नाशिक मार्गासाठी

Double Decker will run cheap after Christmas? | नाताळनंतर डबल डेकर धावणार स्वस्तात ?

नाताळनंतर डबल डेकर धावणार स्वस्तात ?

प्रकाश वराडकर / रत्नागिरी
गणेशोत्सवात कोकण रेल्वेमार्गावर सुरू केलेल्या वातानुकूलित डबलडेकर रेल्वेगाडीला अत्यल्प भारमान मिळाल्याने ही गाडी अन्य मार्गावर चालविण्याचा विचार मध्य रेल्वेकडून सुरू आहे. मात्र, त्याबाबत रेल्वे प्रशासनामध्येच एकवाक्यता नाही. मध्य रेल्वेला ही गाडी अन्य मार्गावर हवी असली तरी नाताळ सणानंतर कोकण रेल्वेमार्गावरच प्रीमिअमऐवजी नेहमीच्या दराने डबलडेकर सुरू ठेवण्याचा दुसरा प्रयोग होणार आहे. त्यातील यशापयशावर मार्ग बदलाबाबत पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
मोठा गाजावाजा करून कोकण रेल्वे मार्गावर डबलडेकर गाडीची चाचणी घेतली होती. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर ‘गणेशोत्सव स्पेशल’ म्हणून ही डबलडेकर २१ आॅगस्टपासून कोकण रेल्वेमार्गावर दिमाखाने धावू लागली. परंतु हा केवळ बाहेरील डामडौल, दिमाख प्रवाशांनी नाकारला. आतील डामडौलाचा वापर करण्यासाठी प्रवासीच अपुरे होते. महागडा प्रवास दर हेच त्याचे कारण असल्याचे प्रवासी सांगत आहेत. त्यामुळे दुसऱ्या प्रयोगावेळी काही ‘हायफाय’ सुविधा कमी करून डबलडेकरचे प्रवासी भाडे कमी केले गेल्यास या गाडीला नक्की चांगला प्रतिसाद मिळेल, अशी प्रवासीवर्गाची भावना आहे.
गणेशोत्सव काळात सुरू झालेली डबलडेकर अखेर १० सप्टेंबरपर्यंत कोकण रेल्वे मार्गावर सुरू राहिली. त्यानंतर या गाडीची चाके थांबली आहेत. मध्य रेल्वेने गणेशोत्सव काळात डबलडेकर ही प्रीमियम गाडी म्हणून चालविली. त्यामुळे प्रवाशांना चढ्या दराला सामोरे जावे लागले. परिणामी ही गाडी केवळ १८ ते २० टक्के भरली.
फसलेल्या पहिल्या प्रयोगाचा अभ्यास केल्यानंतर मध्य रेल्वे अन्य पर्यायांचा शोध घेत होती. परंतु अन्य पर्याय शोधण्याआधी कोकण रेल्वेवरील या गाडीचा पहिला प्रयोग का फसला याची कारणमीमांसा केल्यानंतर त्यातील त्रुटी दूर करून कोकण रेल्वेमार्गावरच या गाडीचा दुसरा प्रयोग करावा व त्यातही असफलता मिळालीच तर अन्य पर्यायांचा विचार करावा, अशा निर्णयावर रेल्वे आली आहे.

Web Title: Double Decker will run cheap after Christmas?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.