कुडाळात डबलबारीसाठी गर्दी
By Admin | Updated: September 17, 2014 22:27 IST2014-09-17T21:48:04+5:302014-09-17T22:27:05+5:30
जिल्ह्यासह गोव्यातील रसिक उपस्थित

कुडाळात डबलबारीसाठी गर्दी
कुडाळ : दरवषीप्रमाणे याहीवर्षी कुडाळ पोलीस ठाणे येथे आयोजित केलेला डबलबारी सामना पाहण्यासाठी जिल्हा तसेच गोवावासीय प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती. डबलबारी सामन्याच्या रंगतीबरोबर ही गर्दी वाढतच गेली. या डबलबारी सामन्याचे उद्घाटन जिल्हा पोलीस उपअधीक्षक उत्तम चौरे यांच्या हस्ते झाले.
कुडाळ पोलीस ठाण्यात गेली अनेक वर्षे पोलीस कर्मचाऱ्यांच्यावतीने गणपती प्रतिष्ठापना करण्यात येते. दरवर्षी येथील गणपतीची २१ दिवस पूजा केली जाते. तर विसाव्या दिवशी डबलबारीचे आयोजन करण्यात येते. या डबलबारी सामन्याच्या उद्घाटनप्रसंगी पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. पी. पवार, पोलीस उपनिरीक्षक सतीश कदम, राजेश म्हाडेश्वर तसेच अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते. येथील डबलबारीचे खास वैशिष्ट्य म्हणजे, या डबलबारीत दोन्ही बुवा एकमेकांना प्रश्नोत्तरे विचारतात. म्हणून या डबलबारीला ‘प्रश्नोत्तरांची डबलबारी’ म्हणूनही ओळखले जाते. प. पू. वासुदेवानंद टेंब्ये स्वामी महाराज प्रासादिक भजन मंडळ, विलेपार्ले- मुंबईचे बुवा प्रमोद धुरी व संतोष शितकर बुवा यांच्यात हा डबलबारीचा जंगी सामना रंगला. धुरी बुवांना पखवाज व ढोलकीसाथ संदीप सकपाळ, तर शितकर बुवांना दादा परब यांनी दिली. (प्रतिनिधी)
निवडणुकीची आचारसंहिता असल्याने या डबलबारीचे आयोजन सायंकाळी ४.३० वाजता करण्यात आले होते. एरव्ही रात्रीच्यावेळी डबलबाऱ्या रंगतात. परंतु सायंकाळी साडेचार वाजता सुरू करूनही येथील डबलबारीला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला, हे विशेष.