ओरोसच्या डॉन बॉस्कोला अजिंक्यपद
By Admin | Updated: January 9, 2015 00:04 IST2015-01-08T21:42:43+5:302015-01-09T00:04:19+5:30
राष्ट्रीय स्काऊट गाईड : महाराष्ट्रातील अनेक संघ सहभागी

ओरोसच्या डॉन बॉस्कोला अजिंक्यपद
ओरोस : तंजावर (तामिळनाडू) येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्काऊट-गाईडच्या बॉस्केरी कॅम्पमध्ये राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र राज्याने आपला ठसा उमटविला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोसच्या डॉन बॉस्को स्कूलने सर्वसाधारण अजिंक्यपदाचा बहुमान पटकावला आहे. यामध्ये महाराष्ट्रासह अनेक संघ सहभागी झाले होते.तामिळनाडू येथील तंजावर मॅट्रीक्युलेशन डॉन बॉस्को ग्राऊंडवर राष्ट्रीय बॉस्कोरी स्काऊट-गाईड कॅम्पमध्ये आसाम, मिझोराम, सिक्कीम, तामिळनाडू, मणिपूर, गुजरात, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवासह महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे, सिंधुदुर्ग यांसह अनेक राज्यांच्या संघांचा समावेश होता. ४ हजार ५०० विद्यार्थी या शिबिरासाठी सहभागी होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ६५ विद्यार्थी सहभागी झाले होते. तंजावर येथील राष्ट्रीय स्काऊट- गाईड कॅम्पमध्ये पायनरींग, कॅम्पफायर, मार्क पास, रांगोळी, पेन्टींग, शोभायात्रा, हॅण्डग्राफी डिस्प्ले, साहसी खेळ, कलर पार्टी, बिनभांडे स्वयंपाक, पेन्ट बनविणे अशा प्रात्यक्षिकांसह सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. देशातून ९ बॉस्कोरी विनर काढले. त्यात ओरोसच्या डॉन बॉस्कोच्या ६५ विद्यार्थ्यांसोबत फादर क्लाईव्ह टेलीस, रोहिदास राणे, स्काऊट टिचर प्रमिला परब, कल्पना हरमळकर, गाईड कॅप्टन ब्रदर मेल्टन बरेटो सहभागी झाले होते. दोन वर्षांपूर्वी गोवा येथेही डॉन बॉस्कोने पहिला क्रमांक मिळविला. (वार्ताहर)
टोप्यांचे गिनीज रेकॉर्ड
बॉस्कोरी कॅम्पमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेमध्ये ४ हजार कागदी टोप्या बनविण्याचा विक्रम केला. चार वर्षात कॅम्पमध्ये ३ हजार ५०० कागदी टोप्या बनविल्या. त्यात विद्यार्थ्यांनी ४ हजार टोप्या बनविण्याचा विक्रम करून पंचांच्या मूल्यमापनात मानाचे स्थान पटकाविल्याने पंचांनी याची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविली. विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह देऊन तसेच प्रमाणपत्र देण्याचे निश्चित केले आहे.