दोडामार्ग तहसीलदार धारेवर
By Admin | Updated: November 23, 2014 23:54 IST2014-11-23T22:29:54+5:302014-11-23T23:54:41+5:30
केसरकरांचे लक्ष वेधले : मनमानी करुन लोकांची कामे अडवतात

दोडामार्ग तहसीलदार धारेवर
कसई दोडामार्ग : दोडामार्ग तहसील कार्यालयातून तालुक्यातील सर्वसामान्य लोकांची वेळीच कामे केली जात नाहीत. काही अधिकारी मनमानी कारभार करीत असून नाहक लोकांची कामे रखडून ठेवून त्रास देण्याचे काम करीत असल्याचे सांगत विविध समस्यांकडे शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी यांनी आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी येत्या दहा दिवसात संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी व ज्यांची विविध प्रकरणे या कार्यालयात रेंगाळत पडली आहेत, त्या सर्वांची एकत्र बैठक घेतली जाणार असल्याचे आमदार केसरकर यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आश्वासन दिले.
दोडामार्ग येथील तहसील कार्यालयातील काही अधिकारी जाणूनबुजून नाहक त्रास देत बरीच प्रकरणे रखडून ठेवत आहेत. अशा अनेक समस्या घेऊन तालुकाप्रमुख बाबूराव धुरी यांनी शुक्रवारी दोडामार्ग तालुका दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर व तहसीलदार संतोष जाधव यांची तहसील कार्यालयात बैठक घडवून आणली. यावेळी गणेशप्रसाद गवस, पांडुरंग नाईक, तालुका संपर्कप्रमुख प्रकाश रेडकर, तालुका संघटक संजय गवस, तालुका सहसंघटक प्रदीप नाईक, उपतालुकाप्रमुख संजय देसाई, गोविंद महाले यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जातीच्या दाखल्यांचे प्रस्ताव वेळीच पुढे पाठविले जात नाहीत, नायब तहसीलदार धनंजय मोरे जाणूनबुजून लोकांना नाहक त्रास देतात, नवीन घर बांधणीसाठी बिगरशेतीची अट केवळ दोडामार्ग शहरापुरती मर्यादित असूनही ग्रामीण भागातील नवीन इमारत बांधकामाचे अर्ज टाऊन प्लानिंगकडे पाठविले जातात. तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांचे जमिनींचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत, आदी विविध समस्या यावेळी बाबूराव धुरी यांनी मांंडल्या.
या बैठकीत आमदार दीपक केसरकरांनी प्रशासनाची बाजू घेतल्याने काही शिवसैनिकांमधून नाराजीचा सूर उमटत होता. (वार्ताहर)
बैठक घेऊन प्रश्न सोडवू : केसरकर
यावेळी आमदार दीपक केसरकर म्हणाले, अशा पध्दतीने तहसील कार्यालयाचा कारभार चालत असेल, तर येत्या दहा दिवसात तहसीलचे सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी व जनतेची बैठक घेऊन जनतेचे प्रश्न सोडविले जातील, असे आश्वासन दिले. येत्या दहा दिवसात तहसीलच्या अनागोंदी कारभारात सुधारणा न झाल्यास तुम्हाला जाब विचारु,असे बाबूराव धुरी यांनी सांगितले.
तालुक्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न बाबूराव धुरी यांनी आमदार दीपक केसरकर व तहसीलदार संतोष जाधव यांच्यासमोर मांडले. यावेळी गणेशप्रसाद गवस, पांडुरंग नाईक, प्रकाश रेडकर, संजय गवस आदी उपस्थित होते.