दोडामार्ग : सुरेश दळवींचे राष्ट्रवादीत ‘कमबॅक’
By Admin | Updated: September 25, 2014 00:20 IST2014-09-24T23:07:15+5:302014-09-25T00:20:01+5:30
केसरकरांना धक्का : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी

दोडामार्ग : सुरेश दळवींचे राष्ट्रवादीत ‘कमबॅक’
दोडामार्ग : राष्ट्रवादी काँग्रेस सोडून आमदार दीपक केसरकर यांच्यासमवेत शिवबंधन बांधलेले दोडामार्ग तालुक्यातील नेते सुरेश दळवी आज, बुधवारी स्वगृही परतले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी सावंतवाडी मतदारसंघाची उमेदवारीही दळवींना जाहीर करण्यात आली. त्यामुळे विधानसभेच्या होणाऱ्या निवडणुकीत दळवी विरुद्ध केसरकर अशी लढत होणार असून, दळवींचा पक्षप्रवेश म्हणजे केसरकरांना मोठा धक्का असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
महाराष्ट्रात सेना-भाजप महायुती आणि काँग्रे्रस-राष्ट्रवादी आघाडीची खलबते सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात थेट दीपक केसरकरांचे खंदे समर्थक सुरेश दळवी यांनाच विधानसभेच्या उमेदवारीची आॅफर देऊन सिंधुदुर्गच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. मतदारसंघातील केसरकरांचे वाढते प्राबल्य लक्षात घेता ते थोपविण्यासाठी राष्ट्रवादीने थेट दळवींना फोडण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या होत्या. त्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना अखेर यश आले. दोडामार्ग तालुक्यासह सावंतवाडी व वेंगुर्ले या तिन्ही तालुक्यांत सुरेश दळवींचा चांगला जनसंपर्क असल्याने मराठा उमेदवार देऊन केसरकरांना शह देण्याची व्यूहरचना राष्ट्रवादीने आखली आहे. त्यादृष्टीने आज सावंतवाडी विधानसभेची उमेदवारी दळवींना जाहीर करण्यात आली. मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, प्रसाद रेगे, पुष्पसेन सावंत, बाळा भिसे, प्रफुल्ल सुद्रिक, आदी उपस्थित होते.
दोडामार्गला प्रथमच संधी
सुरेश दळवी यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने केसरकरांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्याचबरोबर दोडामार्ग तालुक्याला नेतृत्व करण्याचीही प्रथमच संधी मिळाली आहे. आजपर्यंत दोडामार्ग तालुक्यातील एकालाही उमेदवारी मिळाली नव्हती. मात्र, दळवींच्या रूपाने तालुक्याला प्रथमच ही संधी प्राप्त झाल्याने होणारी निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)