आम्ही आत्महत्या करायच्या का ?
By Admin | Updated: March 3, 2015 00:36 IST2015-03-02T21:49:25+5:302015-03-03T00:36:19+5:30
डंपर मालकांनी विचारला जाब : आंबोली घाटातून अवजड वाहतूक सुरू करण्याची मागणी

आम्ही आत्महत्या करायच्या का ?
सावंतवाडी : विदर्भात ज्याप्रमाणे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तशा आत्महत्या डंपर मालकांना तसेच इतर व्यावसायिकांना करण्यासाठी प्रशासन भाग पाडत आहे का, असा सवाल डंपर मालक, लाकूड व्यावसायिकांबरोबरच आंबोली ग्रामस्थांनी बांधकाम विभागाच्या सहायक अभियंता अनामिका जाधव तसेच पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांना केला आहे. दोन दिवसांत हा रस्ता खुला केला नाही, तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा ही दिला आहे.यावेळी माजी सभापती मंगेश तळवणेकर, पंचायत समिती सदस्य बाळा सावंत, दत्तू नार्वेकर, रामदास करंदीकर, सुनिल नार्वेकर, ओवळिये सरपंच बळिराम सावंत, आदी यावेळी उपस्थित होते.आंबोली घाटात पुलाचे काम सुरू आहे. हे काम करण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यासाठी पोलीस व बांधकाम विभागाने संयुक्तरीत्या आंबोली घाटातून अवजड वाहतूकच बंद करायची, असा निर्णय घेतला. या निर्णयानंतर त्यांची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली होती; पण यामुळे कोल्हापूरसह चंदगड, आजरा या ठिकाणी खडी वाळू वाहतूक करणारे तसेच बेळगावला लाकूड वाहतूक करणाऱ्यांना याचा फटका बसू लागला आहे. यामुळे संतप्त डंपर चालकांसह लाकूड व्यावसायिक चांगलेच आक्रमक झाले असून, हा रस्ता तत्काळ सुरू करा, अशी मागणी लावून धरली आहे.दोन दिवसांपूर्वी याबाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधण्यात आले होते; पण कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या डंपर चालकांनी बांधकाम विभागाच्या सहायक अभियंता अनामिका जाधव यांची सोमवारी भेट घेत हा रस्ता तत्काळ सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.तर पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांची ही आंदोलनकर्त्यांनी भेट घेतली. यावेळी देसाई यांनी आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकून घेतली; पण एकेरी वाहतूक सुरू झालीच आणि एखादी दुर्घटना घडली तर त्याला कोण जबाबदार, असा सवाल केला. यावर डंपर मालकांनी आम्ही जबाबदारी घेतो, असे उत्तर दिले. तसेच मुलांच्या परीक्षा सुरू असताना रास्ता रोको केल्यास आपल्या विरोधात गुन्हे दाखल करू, असा इशारा पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांनी दिला आहे.तर डंपर मालकांनीही विदर्भात जशा आत्महत्या सुरू आहेत. तशा आत्महत्या आम्ही करायच्या का, असा सवाल करीत हा रस्ता ऐन हंगामात खोदण्याचा हेतू काय, असा सवालही केला आहे. (प्रतिनिधी)
पुलाचे खड्डेही पिशव्यांनी भरले
आंदोलनकर्त्यांनी या पुलाच्या कामाच्या वेगवेगळ्या सुरस कथा सांगितल्या. गरज नसताना प्रशासनाने हे काम काढले आहे. त्यातच पुलाच्या खड्ड्यात दगड माती टाकायची सोडून पिशव्या टाकल्या जात आहेत. या कामावर कोणाचे लक्ष नाही आणि पुलावर स्लॅब टाकल्यानंतर चार दिवसांत त्यावरून वाहतूक कशी सुरू करणार, असा सवालही उपस्थित करण्यात येत
आहे.
पालकमंत्र्यांनाही प्रशासन जुमानत नाही
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आंबोलीला भेट दिली होती. त्यावेळी आम्ही आमची कैफियत मांडली; पण पालकमंत्री त्याकडे दुर्लक्ष करीत असून आंबोलीत मोठ्या प्रमाणात निकृष्ट कामे यापूर्वी झाली तसेच आता होत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला.