अपेक्षित विकासकामे करु
By Admin | Updated: October 27, 2015 23:58 IST2015-10-27T23:38:11+5:302015-10-27T23:58:25+5:30
नीतेश राणे : विकास आघाडीच्या दोन नगरसेवकांचा काँग्रेसला पठिंबा

अपेक्षित विकासकामे करु
वैभववाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवर विश्वास टाकून विकास आघाडीच्या दोन नगरसेवकांनी नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे विकास आघाडीला अपेक्षित विकासकामे करुन आदर्श शहर बनविले जाईल, असे मत आमदार नीतेश राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
विकास आघाडीच्या माध्यमातून बिनविरोध निवडून आलेले रवींद्र्र रावराणे व सुचित्रा कदम यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे जाहीर करीत आमदार राणे यांनी रावराणे व सुचित्रा कदम यांचे वडील रत्नाकर कदम यांचा कार्यालयात सत्कार केला. यावेळी तालुकाध्यक्ष भालचंद्र्र साठे, महिला बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे, सभापती वैशाली रावराणे, वाभवेचे माजी उपसरपंच गंगाराम उर्फ दादा रावराणे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप रावराणे, नासीर काझी, अरविंद रावराणे, बाळा हरयाण, अंबाजी हुंबे, प्रफुल्ल रावराणे आदी उपस्थित होते.
राणे म्हणाले, वाभवे-वैभववाडी ग्रामपंचायतीची निवडणूक फक्त विकासाच्या मुद्यावर आम्ही लढवत आहोत. त्यामुळे विकास आघाडीने आमच्यावर विश्वास दाखवत दोन नगरसेवकांनी काँग्रेसला पाठिंबा देत विकासासाठी पाऊल पुढे टाकले आहे. त्यामुळे त्यांच्या विश्वासाला साजेसे काम करुन विकासाची घोडदौड आम्ही सुरु ठेवू. जे पक्ष सर्व प्रभागात स्वत:चे उमेदवार देवू शकले नाहीत. ते नगरपंचायतीत निवडून गेले तर शहराच्या विकासाची अवस्था काय असेल याची कल्पना आल्यामुळेच रावराणे व कदम यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे आमदार नीतेश राणे यांनी स्पष्ट केले. तसेच काँग्रेस पक्षाच्या पूर्ण बहुमताचा विश्वास व्यक्त केला. (प्रतिनिधी)
काँग्रेसचा झेंडा फडकवूया ! : गंगाराम रावराणेवाभवेचे माजी उपसरपंच गंगाराम रावराणे यांनी बिनविरोध नगरसेवकांच्या पाठिंब्याबाबत स्पष्ट केले की, गावातील निवडणूक बिनविरोध करून गावाची अस्मिता टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकवून नारायण राणे यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांना एकसंघ राहण्याची गरज आहे.