श्रेय लाटण्याचा खटाटोप करु नये
By Admin | Updated: November 24, 2014 23:13 IST2014-11-24T22:06:16+5:302014-11-24T23:13:45+5:30
दीपक केसरकर : दोडामार्ग येथील कार्यक्रमात प्रतिपादन

श्रेय लाटण्याचा खटाटोप करु नये
कसई दोडामार्ग : राज्य सरकारने मंजूर केलेल्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य करतात, ही लोकांमध्ये संभ्रम निर्माण होणारी बाब आहे. मतदारांनी जागा दाखविली, तरी श्रेय लाटण्याचा खटाटोप कायम आहे, अशी टीका शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी दोडामार्ग येथे केली. बाळासाहेबांनी राज्यात संघटीत केलेली शिवसेना नवीन उंचीवर नेऊया, असे आवाहन यावेळी आमदार केसरकर यांनी केले.
दोडामार्ग येथील लक्ष्मी सभागृहात दोडामार्ग शिवसेनेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संपर्कप्रमुख प्रकाश रेडकर तालुकाध्यक्ष बाबूराव धुरी, गणेशप्रसाद गवस, विशाखा देसाई, पांडुरंग नाईक, संजय देसाई, संजय गवस, गोविंद महाले आदी उपस्थित होते.
आमदार केसरकर म्हणाले, सत्तेत स्थान न मिळाल्यामुळे काही जण नाराज आहेत, असे समजते. परंतु शिवसेनेला काम करण्यासाठी सत्तेची गरज नसून सत्तेशिवाय विकास कामे करण्याची धमक शिवसैनिकात आहे, हे दाखवून द्या. तालुक्यातील तिराळी प्रकल्पग्रस्तांचा, तिलारी कामगारांचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, कुडासे पुलाचा प्रश्न, विर्डी धरणाचा प्रश्न असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. राज्यसरकारमध्ये सध्या केवळ दहाच मंत्री असल्याने बरीच खाती सध्या मुख्यमंत्र्यांकडे आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हे प्रश्न अग्रक्रमाने सोडविण्यात येणार आहेत. तालुक्यातील समस्यांबाबत लवकरच आमसभा घेण्यात येणार आहे. पंतप्रधान सडक योजनेंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. कुडासे पूल मंजूर असून त्याचे टेंडर लवकरच काढून हा प्रश्नही मार्गी लावण्यात येणार असल्याचे आमदार केसरकर यांनी स्पष्ट केले. मार्केटमध्ये अॅलल मिश्रित तसेच सायनीस केमिकल डांबर आले आहे. त्यामुळे डांबराची खात्री करूनच रस्त्याची कामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी
सांगितले. (वार्ताहर)