विकासात राजकारण आणू नका : राणे
By Admin | Updated: July 28, 2015 00:28 IST2015-07-27T23:58:44+5:302015-07-28T00:28:03+5:30
ग्रामसभेला महत्व असून याठिकाणी झालेला ठराव हे महत्त्वाचे ठराव असतात.

विकासात राजकारण आणू नका : राणे
देवगड : ग्रामपंचायत हे विकासाचा केंद्र असून, गावामध्ये खऱ्या अर्थाने या माध्यमातून विकास होऊ शकतो. यामुळे गावचे सरपंच हे नि:पक्षपाती असणे गरजेचे आहे, असे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले. तसेच विकासात कोणतेही राजकारण न आणता विकासाच्या समस्या माझ्यापर्यंत पोहोचवा. मी त्या आमदार या नात्याने नक्कीच मार्गी लावीन असेही ते म्हणाले.
नाडण ग्रामसचिवालयाचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा परिषद सदस्या निकिता तानवडे, जिल्हा परिषद सदस्य सुभाष नार्वेकर, देवगड पंचायत समिती उपसभापती स्मिता राणे, माजी सभापती राजाराम राणे, नाडण सरपंच रामकृष्ण उपरकर, उपसरपंच मकरंद जोशी, सुधीर जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आमदार राणे म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावागावामध्ये विकासाची कामे ही होतच असतात. मात्र, ग्रामसभेला महत्व असून याठिकाणी झालेला ठराव हे महत्त्वाचे ठराव असतात. यामुळे गावच्या ग्रामसभेलाही ग्रामस्थांनी उपस्थित राहाणे महत्त्वाचे असते. देवगड तालुका हा डोंगर दरीमध्ये वसलेला असून, विकासकामे नियोजनबद्ध करावी लागतात, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)