अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका

By Admin | Updated: October 14, 2014 23:23 IST2014-10-14T21:52:16+5:302014-10-14T23:23:54+5:30

दिलीप पांढरपट्टे : सावंतवाडीतील शिबिरात मार्गदर्शन

Do not believe in superstitions | अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका

अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका

सावंतवाडी : अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता डॉक्टरवर विश्वास ठेवून आपल्या आजाराचा योग्य उपचार करून घ्या. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व एपिलेप्सी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आकडी तसेच फेफरे चिकित्सा शिबिराचा लाभ घेतानाच शासनाच्या विविध योजनांचीही माहिती घेऊन त्याचाही लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी केले.
महाराष्ट्र शासनातर्फे उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे आयोजित केलेल्या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. डी. माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, वैद्यकीय अधीक्षक डॉ. यू. बी. पाटील, संस्थापक अध्यक्ष इपिलेप्सी फाऊंडेशन मुंबईचे डॉ. निर्मल सूर्या, डॉ. रामदास रेडकर, डॉ. एस. टी. वंदाळे आदी उपस्थित होते. इपिलेप्सी (फेफरे, आकडी व फीट) अध्ययन अक्षय मेंदू विकाराच्या रुग्णांची तपासणी यावेळी करण्यात आली.
या शिबिरात जिल्हाभरातून ४०२ रुग्णांनी लाभ घेतला. या सर्व रुग्णांची न्युरॉलॉजिस्टतर्फे तपासणी करून मोफत ईसीजी चाचणी घेण्यात आली. रुग्णांना समुपदेशन, स्पीच थेरपी व फिजिओथेरपीची तपासणी करून रु ग्णांना तीन महिन्यांचा मोफत औषधोपचार देण्यात आला.
या शिबिरामध्ये मुंबई येथील अनेक डॉक्टर सहभागी झाले होते. यामध्ये डॉ. निर्मल सूर्या व त्यांचे तज्ज्ञ पथक डॉ. बाजूजी सावंत, डॉ. अशोक शिरसाट, डॉ. जिम्मी लालका, डॉ. गणेश किनी, डॉ. हिमान्शा सोनी, डॉ. संतोष कोन्डेकर, डॉ. उमेश सावंत, डॉ. उषा भावे आदींनी या शिबिरात रुग्णांची तपासणी केली.
तसेच सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. यू. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी या शिबिरासाठी सहकार्य केले. (वार्ताहर)
पथनाट्यातून नागरिकांना आवाहन
आकडी आल्यावर काय करावे, याबाबत अंधश्रद्धा न बाळगता डॉक्टरी उपाय करून घ्यावा. यासंदर्भात इपिलेप्सी फाऊंडेशन मुंबईच्या पथकांनी सावंतवाडी येथील जिल्हा रुग्णालयासमोर पथनाट्य सादर केले. रुग्णांना आकडी आल्यास शांतता राखून रुग्णाला अलगदपणे जमिनीवर ठेवा, अशा अनेक सूचना या पथनाट्यातून नागरिकांना देण्यात आल्या.

 

Web Title: Do not believe in superstitions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.