मुलांना एकलकोंडे होऊ देऊ नये
By Admin | Updated: February 13, 2015 23:00 IST2015-02-13T21:06:06+5:302015-02-13T23:00:21+5:30
वंदना करंबेळकर : पालकांसाठी आयोजित कार्यशाळा

मुलांना एकलकोंडे होऊ देऊ नये
वेंगुर्ले : पूर्वी मुले पालकांना घाबरायची. आता पालकच मुलांना घाबरत आहेत. मुले ही अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे आईबाबा नीट वागत असतील, तर मुलेही नेहमी नीटच वागतील. मुलांना सारख्या सूचना न करता नीट समजावून सांगणे गरजेचे असते. ती एकलकोंडी होणार नाहीत याचीही पालकांनी खबरदारी घ्यायला हवी, असे प्रतिपादन सावंतवाडी येथील समुपदेशक वंदना करंबेळकर यांनी वेंगुर्ले येथे बुधवारी केले. येथील परुळेकर दत्त मंदिराच्या आवारातील मुक्तांगण बालविकास प्रकल्पात पालकांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी मुक्तांगणच्या संचालिका मंगल परुळेकर, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात आपली मोहोर उमटविणाऱ्या वेतोरे हायस्कूलच्या उपक्रमशील शिक्षिका स्वाती प्रभूखानोलकर, अॅड. देवदत्त परुळेकर, यंदाच्या राज्य विज्ञान प्रदर्शनात अव्वल विद्यार्थिनीचा मान मिळविणारी मुक्तांगणची माजी विद्यार्थिनी मृण्मयी प्रभूवालावलकर, आदी उपस्थित होते. यावेळी मृण्मयी वालावलकरचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रारंभी मंगल परुळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेच्या शेवटी पालकवर्गातून आलेल्या विविध प्रश्नांना करंबळेकर यांनी अनुकूल उपाय सुचविले. मंगल परुळेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)