जिल्हा साहित्य संमेलन १८ रोजी
By Admin | Updated: October 5, 2015 00:01 IST2015-10-04T21:52:45+5:302015-10-05T00:01:24+5:30
कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा साहित्य संमेलन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळ्यानंतर आमदार सामंत यांनी संमेलनाची रूपरेषा

जिल्हा साहित्य संमेलन १८ रोजी
रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य संमेलनातर्फे १८ रोजी रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वयंवर मंगल कार्यालयात संमेलन होणार असल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा साहित्य संमेलन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळ्यानंतर आमदार सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये संमेलनाची रूपरेषा विषद केली. सकाळी ८ वाजता मारूती मंदिर ते स्वयंवर मंगल कार्यालयापर्यंत साहित्य दिंडी काढण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनासाठी स्वागताध्यक्ष खासदार विनायक राऊत, संमेलनाध्यक्ष रामदास फुटाणे, उद्घाटक अशोक नायगावकर, प्रमुख अतिथी म्हणून मधु मंगेश कर्णिक, आमदार उदय सामंत, डॉ. महेश केळुस्कर, उर्मिला पवार, अरूण म्हात्रे उपस्थित राहणार आहेत.
दुपारी १२ वाजता कोकणच्या बोलीभाषा विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. आनंद बोंद्रे ‘संगमेश्वरी’, निधी पटवर्धन ‘दालदी’, मिलिंद पेडणेकर ‘मालवणी’, प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे ‘खारवी’ बोली भाषेविषयी संवाद साधणार आहेत. दुपारी २ वाजता परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. ‘साहित्य व आजचा युवक’ विषयावर परिसंवाद होणार असून, अध्यक्षस्थान डॉ. विद्याधर करंदीकर भूषवणार आहेत. यामध्ये चिन्मयी मटांगे, वेदवती मसुरकर, रेणुका भडभडे, गौरी सावंत सहभागी होणार आहेत. दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादामध्ये ‘साहित्यातील कोकण’ या विषयावर होणाऱ्या परिसंवादाचे अध्यक्षस्थान उर्मिला पवार भूषवणार आहेत. यामध्ये डॉ. श्रीकृष्ण जोशी, प्रा. श्रध्दा राणे, प्रा. वर्षा फाटक सहभागी होणार आहेत. सायंकाळी ४ वाजता प्रकट कथा वाचन श्रीकांत पाटील, मिलिंद पेडणेकर करणार असून, प्र. ल. मयेकरांच्या कथांचे वाचन करणार आहेत. सायंकाळी ४.४५ वाजता कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अध्यक्षस्थान अरूण म्हात्रे भूषविणार असून, कवी अशोक नायगावकर, रामदास फुटाणे, डॉ. महेश केळुस्कर, अशोक बागवे, शाखानिहाय ३ प्रमाणे २७ कवी सहभागी होणार आहेत. सायंकाळी ६ वाजता समारोपाचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी साहित्यिक विश्वास पाटील उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)
शाखानिहाय तीन याप्रमाणे २७ कवी सहभागी होणार.
रत्नागिरीतील स्वयंवर मंगल कार्यालयात होणार.
विविध परिसंवादाबरोबरच अन्य कार्यक्रमांचेही आयोजन.
साहित्य संमेलन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन.