जिल्हा काँग्रेसच्यावतीने डेंग्यू निर्मूलन अभियान राबविणार
By Admin | Updated: November 5, 2014 23:32 IST2014-11-05T22:52:07+5:302014-11-05T23:32:49+5:30
नीतेश राणे : लवकरच कार्यक्रम जाहीर करणार

जिल्हा काँग्रेसच्यावतीने डेंग्यू निर्मूलन अभियान राबविणार
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात डेंग्यूचे रूग्ण आढळत असून याबाबत जिल्हा काँग्रेसच्यावतीने जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील विविध गावांमध्ये डासप्रतिबंधक औषध फवारणी करण्याबरोबरच डेंग्यू निर्मूलन अभियान राबविणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रांतिक सदस्य आमदार नीतेश राणे यांनी दिली.
येथील काँगे्रस संपर्क कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार राणे म्हणाले, डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी पाच फॉगिंग मशीन खरेदी करण्यात येणार आहेत. काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष तसेच जिल्हा परिषद सदस्य व इतर पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात डेंग्यू निर्मूलन अभियान राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील जनतेला आरोग्य सुविधांअभावी त्रास होऊ नये, यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. शासकीय रूग्णालयांमधील डॉक्टरसह इतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत, यासाठी शासनाजवळ पाठपुरावा करण्यात येईल. शासकीय रूग्णालयात सर्पदंशावरील औषधांचा तुटवडा असल्याने अनेक रूग्णांना खासगी रूग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागत आहेत. त्यासाठी शासकीय रूग्णालयात औषधांचा साठा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात बीएसएनएलबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. याबाबत तातडीने निर्णय घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी आपण बीएसएनएलकडे केली आहे. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लवकरच याबाबत निर्णय होईल, असेही आमदार राणे यांनी यावेळी सांगितले.
हलगर्जीपणा नको
लेप्टो तसेच डेंग्यूमुळे रूग्ण दगावत असल्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहेत. त्यामुळे जनतेच्या आरोग्याबाबत कोणताही हलगर्जीपणा करू नका, अशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत. काँग्रेसची सत्ता असलेल्या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना विशेष काळजी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे कणकवली शहरातही डेंग्यूचा रूग्ण आढळल्यामुळे नगराध्यक्षांजवळ याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. यापुढे मोकाट गुरे, भटके कुत्रे अशा समस्यांबाबतही तातडीने उपाययोजना करण्यात येतील, असेही आमदार नीतेश राणे म्हणाले.
पदासाठी वशिलेबाजी चालणार नाही
काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याजवळ राजीनामा दिला आहे. जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्यामुळे जिल्हा कार्यकारिणीही बरखास्त झाली आहे. लवकरच नवीन पदाधिकारी निवडण्यात येतील. पक्ष संघटनेसाठी काम करणाऱ्यांनाच यापुढे पदे दिली जातील. निवडणुकीत पक्षाला मताधिक्य मिळवून देणाऱ्या कार्यकर्त्यांचा पदांसाठी विचार केला जाईल. यापुढे पदासाठी कोणाचीही वशिलेबाजी चालणार नाही. पक्षाचे काम करा आणि पद घ्या, असे धोरण पक्ष संघटनेत ठेवण्यात येणार असल्याचे आमदार राणे यांनी स्पष्ट केले.
कालव्यासाठी पाठपुरावा करणार
देवधर धरण प्रकल्पाचे काम पूर्ण होत आले आहे. याठिकाणी कालवे बांधल्यास शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. यासाठी नवीन शासनाने कामकाज सुरु केल्यावर संबंधित मंत्र्यांजवळ पाठपुरावा करणार आहे. अजून मी आमदारकीची शपथ घेतलेली नाही.
विधीमंडळाचे अधिवेशन ११ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. शपथविधीचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण सर्व कामांचा आढावा घेवून एक-एक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नीतेश राणे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट
केले. (वार्ताहर)
पक्ष बांधणीकडे लक्ष
जिल्ह्यात काँग्रेस पक्ष तळागाळात मजबूत करण्यासाठी पुनर्बांधणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कार्यकर्त्यांना वेगवेगळे उपक्रम देवून त्या उपक्रमात मग्न ठेवणार आहे. जेणेकरून त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण होईल, असेही नीतेश राणे म्हणाले.