बदलत्या हवामानाने जिल्हा कोलमडला

By Admin | Updated: March 3, 2015 00:33 IST2015-03-02T23:13:08+5:302015-03-03T00:33:02+5:30

पावसाने रडवले : वार्षिक गणितं मांडणाऱ्या बागायतदारांचे भविष्य अवघड वळणावर...

District collapses with changing weather | बदलत्या हवामानाने जिल्हा कोलमडला

बदलत्या हवामानाने जिल्हा कोलमडला

रत्नागिरी : जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे ७२.६३ टक्के, तर काजूचे ६१.२० टक्के इतके नुकसान झाले आहे. पावसामुळे मोहोर कुजण्याबरोबर भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकरीनिहाय पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत.जिल्ह्याला अर्थार्जन मिळवून देणारे आंबापीक असून, जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रावर पावसामुळे परिणाम झाला आहे, पीक धोक्यात आले आहे. सतत दोन दिवस कोसळलेल्या पावसामुळे फुलोरा धुवून निघाला आहे. शिवाय ज्या फुलोऱ्याला कणी ते सुपारीएवढी फळधारणा झाली होती, त्या फुलोऱ्यामध्ये पाणी साचून कुजण्याबरोबर फळे गळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय जो आंबा मोठा होता त्या आंब्यावर काळे डाग पडण्याबरोबर आंबा देठाजवळ कुजून गळण्याचा संभव आहे. शिवाय भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. जिल्ह्यातील ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून ५० हजार ९७६ हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाल्याने पीक धोक्यात आले आहे. काजूचा फुलोरा पावसामुळे गळून पडला आहे. शिवाय काजू बीमध्ये पाणी गेल्याने बी टपोरी होणार आहे. संबंधित बी वाळविली तरी गराचा आकार, रंग व चवीवरही परिणाम होणार आहे. पांढऱ्या रंगाऐवजी गर पिवळट पडण्याचा धोका आहेच, शिवाय तुकडा पडण्याची शक्यता अधिक आहे. कृषी विभागाने नुकसानक्षेत्र जाहीर केले असले तरी शेतकरीनिहाय पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामसेवक, कृषिसेवक व कृषी अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

सोसाट्याचा वारा आणि पावसात मासेमारीच बुडाली
प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी
अवकाळी पाऊस व हवामानातील बदलामुळे गेल्या आठवडाभरात जिल्ह्यातील मच्छिमारीला मोठा फटका बसला आहे. गेल्या दोन दिवसांतील पावसाने तर मच्छिमारी नौकाच बंदरात उभ्या करून ठेवाव्या लागल्याने मच्छिमारी व्यवसायातील सुमारे पाच कोटींची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे मच्छिमार हवालदील झाले आहेत. यामुळे बाजारपेठेतही मासळीची टंचाई निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील हर्णै, दाभोळ, जयगड, मिरकरवाडा, पावस, तुळसुंदे, राजीवडा, नाटे यांसारख्या मच्छिमारी बंदरात साडेचार हजारांवर मोठ्या यांत्रिक मच्छिमारी नौका आहेत. छोट्या नौका ३ हजारांवर आहेत. बिगर यांत्रिकी नौका १२०० असून, गेल्या दोन दिवसांतील पावसामुळे खोल समुद्रात मासेमारीला न जाता या नौका संबंधित बंदरात नांगरून ठेवण्यात आल्या होत्या.
रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदर हे मोठे मासेमारी बंदर म्हणून ओळखले जाते. गेल्या दोन दिवसात या बंदरातील नौकाही नांगरून ठेवणेच मच्छिमारांनी पसंत केले. सहा वर्षांपूर्वीच्या फयान वादळाच्या वेळी ज्या दुर्घटना खोल समुद्रात घडल्या होत्या, त्यामुळे मच्छिमार नेहमीच सावध राहणे पसंत करतात.
याबाबत माहिती देताना मच्छिमार नेते आप्पा वांदरकर यांनी सांगितले की, गेले दोन महिने वातावरणात सातत्याने चढ-उतार होत आहेत. त्यामुळे सुरमई, पापलेट, हालवा, मोडोसा यांसारखे चवीचे मासे मिळण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे.
गेल्या दोन दिवसात पावसामुळे तर मच्छिमारी नौका खोल समुद्रात गेल्याच नाहीत. त्यामुळे मच्छिमारी व्यवसायाची काही कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. मासेमारी नौकांवर काम करणाऱ्या खलाशांचा पगार मात्र द्यावाच लागतो. त्यामुळे वातावरण लवकरात लवकर नॉर्मल होऊन पूर्ण क्षमतेने मासेमारी सुरू होण्याची मच्छिमारांना प्रतीक्षा आहे.

Web Title: District collapses with changing weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.