जिल्हा प्रशासन सापडले गोत्यात
By Admin | Updated: July 18, 2014 23:15 IST2014-07-18T23:04:00+5:302014-07-18T23:15:09+5:30
कोटीच्या घरात वसुली : पंचायत राज समितीच्या दौऱ्याची पार्श्वभूमी

जिल्हा प्रशासन सापडले गोत्यात
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंचायत राज समिती येण्याच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाने करोडो रूपयांची वसुली केली असून यापूर्वी दोनवेळा जमा केलेल्या निधीचे काय झाले? असा प्रश्न कर्मचाऱ्यांतून उपस्थित होत आहे. दोनवेळा दौरा रद्द झाल्यानंतर आता ही समिती जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर उपस्थित झालेल्या या प्रश्नामुळे जिल्हापरिषद प्रशासन पुरतेच गोत्यात आले आहे.
दरम्यान, सर्व शिक्षक संघटनांनी या वर्गणी वसुलीला विरोध करीत आवाज उठविल्यानंतर आता इतर कर्मचाऱ्यांनीही तोंड उघडण्यास सुरूवात केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या तपासणीसाठी विधानपरिषद आमदारांची पंचायत राज समिती गेल्या दीड वर्षापासून जिल्हा दौऱ्यावर येणार असे दौरे निश्चित होत होते. यापूर्वी मार्च २०१३ व त्यानंतर फेब्रुवारी २०१४ असे दोनवेळा ही समिती येणार अशा सूचना आल्या. या सूचनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद विभाग, कर्मचाऱ्यांकडून वर्गणी घेण्यास सुरूवात केली आणि या दोन्हीही वेळी तशी वर्गणी वसुलही केली. मात्र या दोन्हीवेळी समिती आली नाही. आता तिसऱ्यावेळी म्हणजे १७ जुलैपासून ही समिती सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आली असून या पार्श्वभूमीवर तिसऱ्यांदा पुन्हा वर्गणी जमा करण्यात आली.
अशी बसवली गेली वर्गणी
जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागवार वर्गणी बसविण्यात आली असून ही वर्गणी कर्मचारी पदांप्रमाणे कमी-जास्त असते. जिल्हा परिषद व पंचायत समिती मिळून एकूण १५०० कर्मचारी असून २ हजार ते ५ हजार अशी प्रत्येकी वर्गणी बसवली जाते. त्यामुळे हा आकडा सरासरी प्रत्येकी कर्मचारी ३ हजार धरल्यास सुमारे ४५ लाखांवर पोहोचत आहे.
त्याचप्रमाणे प्रती प्राथमिक आरोग्य केंद्र ५ हजार याप्रमाणे ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे मिळून १ लाख ९० हजार रुपये, पशुवैद्यकीय अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय ५० हजार तर तालुका कार्यालयाकडून प्रत्येकी २५ हजार मिळून २ लाख ५० हजार रुपये, प्रती ग्रामसेवक २ हजार याप्रमाणे सुमारे ७ लाख, सार्वजनिक बांधकाम विभाग २ लाख, तसेच इतरही काही महत्त्वाच्या कार्यालयांकडून ही वर्गणी वसूल केली गेली आहे. यात जिल्हा परिषद परिचर व चालकांना वगळण्यात आले असल्याचेही बोलले जात आहे.
पहिल्या दोन वेळची
वर्गणी गेली कुठे?
यापूर्वी दोन वेळा असाच सुमारे ६० लाख रुपये निधी घेतला. असा आतापर्यंत सुमारे १ कोटी ६० लाख रुपये प्राप्त झाल्याचे बोलले जात असून यापूर्वी दोनवेळा गोळा केलेल्या पैशांचे काय झाले? ते कोठे खर्ची केले? त्याची स्थिती काय? असे एक ना अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, यावेळी या निधीबाबत शिक्षक संघटनांनी नकार देत या प्रकरणाला वाचा फोडली असल्याने आता इतर कर्मचारीही याबाबत उघड उघड बोलू लागले आहेत. मात्र, ऐन पीआरसीच्या दौऱ्यातच हे प्रकरण बाहेर आल्याने पैसे वसूल करणाऱ्यांची मात्र बोबडी वळली आहे. (प्रतिनिधी)