जोखीमग्रस्त भागात गोळ्या वाटप
By Admin | Updated: July 25, 2014 22:52 IST2014-07-25T22:36:13+5:302014-07-25T22:52:50+5:30
नामदेव सोडल : लेप्टोप्रतिबंधक उपाययोजना सुरू

जोखीमग्रस्त भागात गोळ्या वाटप
सिंधुदुर्गनगरी : कणकवली तालुक्यातील हळवल येथील ७५ जणांवर लेप्टो प्रतिबंधक उपाययोजना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे सुरू करण्यात आल्या आहेत. लेप्टो प्रतिबंधक गोळ््या वाटपाचा कार्यक्रम जिल्ह्यातील १७८ लेप्टो जोखीमग्रस्त गावामध्ये राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. नामदेव सोडल यांनी दिली.
कणकवली तालुक्यातील हळवल येथील स्मिता शांताराम राणे (वय ५०) ही लेप्टो पॉझिटिव्ह आढळल्यामुळे तिला येथील जिल्हा रूग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
स्मिता राणे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. डी. माने यांनी सांगितले. कणकवली तालुक्यातील हळवल येथे सर्व्हे करून तेथील ७५ जणांवर लेप्टो प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात यावर्षी १७८ गावे लेप्टो जोखीमग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली असून यामध्ये सर्वाधिक कुडाळ तालुक्यात ४३ आहेत. तर कणकवली- ४१, मालवण- २६, वैभववाडी- ९, देवगड- १६, वेंगुर्ला- १६, सावंतवाडी- १६ तर दोडामार्ग तालुक्यातील लेप्टो जोखीमग्रस्त ११ गावांचा समावेश आहे.
या जोखीमग्रस्त १७८ गावांमध्ये लेप्टो प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येत आहेत. तर लेप्टो साथ फैलावू नये यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन व जनजागृती करण्यात येत आहे. लेप्टो प्रतिबंधात्मक उपाययोजनेला जूनपासूनच सुरूवात केली असतानाही हळवल येथील महिला लेप्टोबाधीत आढळल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा उपाययोजनेसाठी अधिक सतर्क करण्यात आली आहे.
उपाययोजना करताना दक्षता घेण्याचे आदेश सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहिती डॉ. नामदेव सोडल यांनी दिली. (प्रतिनिधी)