१९ दुर्धर रुग्णांना धनादेश वाटप
By Admin | Updated: January 5, 2015 00:36 IST2015-01-04T22:15:24+5:302015-01-05T00:36:32+5:30
जिल्हा परिषद : २५ लाखांचा निधी

१९ दुर्धर रुग्णांना धनादेश वाटप
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत दुर्धर आजारी रुग्णांना आर्थिक मदत योजनेतून जिल्ह्यातील १९ दुर्धर आजारी रुग्णांना शुक्रवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत दुर्धर आजारी रुग्णांच्या औषधोपचारासाठी आर्थिक मदत देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजनेसाठी जिल्हा परिषदेने २५ लाख निधीची तरतूद केली आहे. या योजनेतून आतापर्यंत जिल्ह्यातील कॅन्सर, हृदयरोग अशा आजाराने पीडित ८५ रुग्णांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे, तर यासाठी १२ लाख ५ हजार ५१७ एवढा निधी खर्च करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत १९ पात्र लाभार्थ्यांना शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. यामध्ये जनार्दन गावकर (कणकवली-ओटव), महादेव तोरसकर (ओसरगाव), रितीका पेडणेकर (आरवली-वेंगुर्ला), शंकर चव्हाण (तळवडे- सावंतवाडी), ओंकार बर्डे (तळवडे- सावंतवाडी), सुवर्णा गावडे (माडखोल- सावंतवाडी), शुभांगी चव्हाण (देवगड), नंदा कुलकर्णी (आचरा-मालवण), सुभाष परब (वायरी- मालवण), विश्राम कदम (आडवली- मालवण), अनंत हरिदास (आकेरी- कुडाळ), दीपाली सावंत (वर्दे- कुडाळ), नारायण देसाई (हुमरमळा- कुडाळ), प्रकाश भगत (आकेरी- कुडाळ), शुभांगी राऊळ (माड्याचीवाडी- कुडाळ), विलास मालवणकर (नेरूर- कुडाळ), प्रभावती सावंत (नेरूरपार- कुडाळ) यांना योजनेचा लाभ देण्यात आला. या योजनेत जास्तीत जास्त १५००० रुपये एवढी आर्थिक मदत देण्यात येते.
शुक्रवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संदेश सावंत यांच्या दालनात झालेल्या धनादेश वाटपाच्या कार्यक्रमास शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, महिला व बालविकास सभापती स्नेहलता चोरगे, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठले, जिल्हा परिषदेच्या सदस्या विभावरी खोत, आरोग्य विभाग कर्मचारी नंदकिशोर आचार्य, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)